आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘परीक्षा पे चर्चा’:150 देशांचे विद्यार्थी, 50 देशांतील शिक्षक आणि पालकांनी केली नोंदणी

औरंगाबाद8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘परीक्षा पे चर्चा’च्या (पीपीसी) सहाव्या भागात संवाद साधणार आहेत. दिल्ली येथील तालकटोरा इनडोअर स्टेडियमवर २७ जानेवारीला सकाळी ११ वाजता हा सोहळा होणार आहे. यामध्ये देश-विदेशातील कोट्यवधी विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांचा सहभाग असणार आहे. यंदा ‘परीक्षा पे चर्चा’मध्ये सहभाग नोंदवण्यासाठी अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. सुमारे ३८. ८० लाख विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांनी यासाठी नोंदणी केली आहे. १५० देशातील विद्यार्थी, ५१ देशांतील शिक्षक आणि ५० देशांतील पालकांनी नोंदणी केली आहे. तणावमुक्त वातावरणाची निर्मिती करण्यासाठी पंतप्रधान देशातील परीक्षार्थी, शिक्षक आणि पालकांना काही सूचना आणि मार्गदर्शन करणार आहेत. प्रत्येक विद्यार्थ्याचे वेगळेपण आणि त्यांच्या सर्वांगीण विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी हे महत्त्वाचे पाऊल आहे. विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि समाजाला प्रोत्साहन देण्यासाठी पंतप्रधानांनी सुरू केलेली ही स्तुत्य मोहीम आहे.

या कार्यक्रमाद्वारे माननीय पंतप्रधान विद्यार्थ्यांशी संवाद साधतील, तथापि परीक्षेचा ताण आणि त्या संबंधित समस्यांवर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देणार आहेत. तुम्हाला माहिती आहेच की, परीक्षेचा ताण हा आपल्यासमोर असलेल्या सर्वात गंभीर समस्यांपैकी एक आहे. ज्याचा तुम्ही-आम्ही नेहमी सामना करतोच आहोत. आगामी परीक्षांबाबत थोडा ताण वाटणे साहजिक आहे. किंबहुना थोडासा ताणही तुम्हाला आव्हान देऊ शकतो आणि तुम्हाला अधिक मेहनत करण्यास प्रवृत्तही करू शकतो. परंतु परीक्षेचा हाच ताण त्यावेळी समस्या बनू शकतो, ज्या वेळी तुमच्या शैक्षणिक आणि काही तरी साध्य करण्यात अडथळा निर्माण करू शकतो.

अशा परिस्थितीत, पालक आणि शिक्षक दोघेही मुलांच्या जीवनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. स्वत:ची स्वप्ने विद्यार्थ्यांवर कदापि लादू नयेत ही जबाबदारी पालकांप्रमाणे शिक्षकांचीदेखील आहे. पंतप्रधानांचे लोकप्रिय पुस्तक ‘एक्झाम वॉरियर्स’चाही यामध्ये महत्त्वाचा वाटा आहे. कारण हे पुस्तक आता १३ वेगवेगळ्या भाषांमध्ये उपलब्ध आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांनी शिक्षणाकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन दिला आहे. पंतप्रधानांनी अनेकदा म्हटले आहे की, ‘पूर्ण क्षमतेने आणि समर्पण देऊन अभ्यास करणाऱ्यांसाठी अशा परीक्षांनी काहीच फरक पडत नाही. अशा परीक्षांचा अभ्यासू विद्यार्थी कधीही ताण घेत नाहीत. विद्यार्थ्यांनी केवळ परीक्षेसाठी अभ्यास न करता ज्ञान मिळवण्यासाठी अभ्यास केला पाहिजे. परीक्षा, वेळेचे व्यवस्थापन, तणाव आणि इतर संबंधित समस्यांबाबत विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांच्या चिंता दूर करण्यात ‘परीक्षा पे चर्चा’ हा उपक्रम मोठी भूमिका बजावू शकेल.

बातम्या आणखी आहेत...