आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Aurangabad
  • Substantial Development Works Will Be Done In Maharashtra From 10 Lakh Crores For Infrastructure, Union Minister Of State For Finance Dr. Claim Of Bhagwat Karad

एक्सक्लुझिव्ह:पायाभूत सुविधांसाठीच्या 10 लाख कोटींतून महाराष्ट्रात भरीव विकासकामे, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. कराडांचा दावा

प्रवीण ब्रह्मपूरकर | औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • महाराष्ट्रात नर्सिंग कॉलेज, कृषी माल साठवणुकीसाठी गोदामे वाढतील

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी बुधवारी संसदेत सादर केला. त्यांच्यासोबत केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड हेही उपस्थित होते. ‘यंदाचे बजेट अमृत काळात देशाला समृद्धीकडे नेणारे आहे. युवा वर्ग, महिला, ज्येष्ठ नागरिक, शेती, उद्योग, पर्यटन, आरोग्य अशा सर्वच क्षेत्रांना फायदेशीर ठरतील अशा भरीव तरतुदी त्यात करण्यात आल्या आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पायाभूत सुविधांसाठी जी १० लाख कोटींची तरतूद केली आहे त्यासह इतर योजनांच्या माध्यमातून भरीव निधी आपल्याकडे आणून महाराष्ट्राचा विकास करण्याचा आपला प्रयत्न राहील,’ अशी ग्वाही त्यांनी ‘दिव्य मराठी’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत दिली.

प्रश्न : बजेट नेमके कुणासाठी लाभदायी?
डॉ. कराड
: सर्वच क्षेत्रांना दिलासा देणारे हे सर्वसमावेशक बजेट आहे. छोट्या उद्योगांसाठीही यात तरतूद करण्यात आली. पायाभूत सुविधांसाठी १० लाख कोटींची तरतूद केल्यामुळे या कामासाठी लागणाऱ्या स्टील, सिमेंट या उद्योगाला चालना मिळेल. नोकरदारांसाठी प्राप्तिकराची मर्यादा ७ लाखांपर्यंत वाढवल्यामुळे देशभरातील मध्यमवर्गीयांना त्याचा फायदा होणार आहे.

प्रश्न : विरोधकांच्या मते, हा आकड्यांचा खेळ?
डॉ. कराड
: मुळात हे विरोधकांच्या डोक्याबाहेरचे बजेट आहे. केवळ निवडणुका आहेत म्हणून त्याला इलेक्शन बजेट म्हणणे याला काहीच अर्थ नाही. गेल्या वर्षी ३९ लाख ४५ हजार कोटींचे बजेट होते, त्यात १० टक्के वाढ करून ४५ लाख ३ हजार ५०० कोटींपर्यंत ते वाढवण्यात आले आहे.

प्रश्न : पण वित्तीय तुटीबाबत काय सांगाल ?
डॉ. कराड :
वित्तीय तूट ६.४ वरून ५.८ इतकी असणार आहे. डिसेंबरचा महागाई दर ५.७ इतका आहे. इतर देशांच्या तुलनेत आपल्या देशाच्या विकास दराची स्थिती खूपच चांगलीच आहे. त्यामुळे जगात घडणाऱ्या आर्थिक घडामोडींमुळे इतर देशांवर परिणाम झाला तरी आपल्या अर्थव्यवस्थेला नजीकच्या भविष्यात काहीही अडचणी येणार नाहीत.

प्रश्न : आरोग्य क्षेत्र, ग्रामीण भागाचा विकास, शेतकऱ्यासंाठी नेमके काय मिळाले ?
डॉ. कराड :
शेतीच्या कर्जासाठी २० लाख कोटींची तरतूद करण्यात आली आहे. कृषी मालाची साठवणूक करण्यासाठी को-ऑपरेटिव्ह सोसायट्यांना केंद्र सरकार अर्थसाह्य करणार आहे. यातून गोदामे उभारली जातील व कृषी मालाची साठवण ठेवता येईल. त्यामुळे जेव्हा चांगला भाव मिळेल तेव्हा शेतकऱ्यांना विकता येईल. आरोग्याच्या बाबतीत म्हणाल तर प्रत्येक मेडिकल कॉलेजच्या ठिकाणी नर्सिंग कॉलेज उभारण्यात येणार आहे. वैद्यकीय संशोधनासाठीही निधीची तरतूद
करण्यात आली. त्याचा महाराष्ट्राच्या आरोग्य क्षेत्रालाही मोठा लाभ होईल.

प्रश्न : रेल्वेसाठी काय ते गुलदस्त्यातच आहे, मराठवाड्यात दुहेरीकरण होणार की नाही?
डॉ. कराड :
रेल्वेच्या बजेटमध्ये गेल्या वेळी १ लाख ३७ हजार कोटींची तरतूद होती. यंदा २ लाख ४० हजार कोटींपर्यंत वाढवली आहे. पण कोणत्या प्रकल्पासाठी नेमकी किती तरतूद केली आहे हे आपले रेल्वेमंत्रीच सांगू शकतील.

प्रश्न : तुमचे हे दुसरे बजेट, काय सांगाल?
डॉ. कराड : बजेटची तयारी सप्टेंबरमध्येच सुरू होते. सर्व राज्यांच्या अर्थमंत्र्यांची मते त्याआधी घेतली जातात. पंतप्रधान, कॅबिनेट, राष्ट्रपतींची मंजुरी घेतल्यानंतर ते संसदेत सादर केले जाते. मला दुसऱ्यांदा ही संधी मिळाली हा सर्व औरंगाबादकरांचा बहुमान आहे.

पर्यटन विकासासाठीच्या ५० शहरांत औरंगाबादला स्थान
प्रश्न : पर्यटन क्षेत्राच्या वाढीसाठी बजेटमध्ये काय मिळाले?

डॉ. कराड : पर्यटन क्षेत्राच्या विकासासाठीही बजेटमध्ये तरतुदी केल्या आहेत. देशभरातील ५० पर्यटन शहरांतील पायाभूत सुविधांचा विकास केला जाणार आहे. महाराष्ट्राची पर्यटननगरी असलेल्या औरंगाबादचा यात समावेश करून या शहराचा विकास करण्यासाठी मी स्वत: पुढाकार घेऊन प्रयत्नशील असेन.

बातम्या आणखी आहेत...