आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
देशभरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने सरकार आणि आरोग्य यंत्रणेच्या चिंतेत भर पडली आहे. अशा स्थितीत औरंगाबादेत मात्र दिलासा देणारी घटना घडली. जिल्हा रुग्णालयात कोरोनाबाधित गर्भवतीची शनिवारी दुपारी १२ वाजून ४० मिनिटांनी सिझेरियनद्वारे यशस्वी प्रसूती करण्यात आली. तिने गोंडस मुलीला जन्म दिला. नवजात शिशूचे वजन तीन किलो १२० ग्रॅम असून तिचा स्वॅबही तपासणीसाठी घेण्यात आला. कोरोनाबाधित महिलेची यशस्वी प्रसूती झाल्याची महाराष्ट्रातील ही पहिली, तर देशातील दुसरी घटना असल्याचा दावा जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी यांनी केला.
१२ एप्रिल रोजी कोरोना पॉझिटिव्ह गर्भवती जिल्हा रुग्णालयात दाखल झाली होती. १० एप्रिल रोजी ती जोगेश्वरी येथून औरंगाबादमधील बायजीपुरा येथे आली. या महिलेचे ९ महिने ९ दिवस पूर्ण झाले होते. मात्र, तरीही ती सिझेरियनसाठी तयार होत नव्हती. प्रसूती विभागप्रमुख डॉ. कमलाकर मुदखेडकर, डॉ. कविता जाधव, भूलतज्ञ डॉ. प्रदीप कुलकर्णी, बालरोगतज्ञ भारती नागरे, परिचारिका ज्योती दारवंटे, सुरेखा ढेपले, आशा मेरी थॉमस यांच्या टीमने ही कामगिरी केली आहे. प्रसूतीवेळी पीपीई किट घालून सर्वांनी योग्य ती काळजी घेतल्याची माहिती डॉ. कमलाकर यांनी दिली.
आईचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतरच बाळाला देणार जवळ
जिल्हा शल्यचिकित्सक सुंदर कुलकर्णी म्हणाले की, या महिलेसह तिच्या १७ वर्षांच्या मुलाचादेखील स्वॅब पॉझिटिव्ह आला होता. कोरोना पॉझिटिव्ह गर्भवतीची यशस्वी प्रसूती झाल्याची दिल्लीनंतरची ही दुसरी आणि महाराष्ट्रातील पहिलीच घटना आहे. बाळाचा स्वॅब घेण्यात आला असून नवजात शिशूला आईपासून दूर ठेवले आहे. अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर बाळाची व आईची भेट घालून दिली जाईल. आईचे दूध निर्जंतुक करून बाळाला देण्यात येणार आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.