आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वैद्यकीय आश्चर्य:प्रचंड रक्तस्राव होणाऱ्या गरोदर महिलेवर यशस्वी शस्त्रक्रिया, मातेसह जुळ्या मुलांना वाचवण्यात घाटीच्या डॉक्टरांना यश

औरंगाबाद / डॉ. शेखर मगरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

घाटीच्या स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र विभागातील डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करून एका गरोदर महिलेचे प्राण वाचवले. गर्भात जुळी मुले आणि प्रसववेदनेच्या वेळी प्रचंड रक्तदाब वाढला. त्यामुळे महिलेच्या पोटात रक्तस्राव सुरू झाला. अशा केसेसमध्ये रक्त गोठण्याची प्रक्रिया पूर्णपणे थांबून माता मृत्यू ओढवतो. पण डॉ. श्रीनिवास गडप्पा आणि त्यांच्या टीमने अडीच तासांच्या शस्त्रक्रियेद्वारे महिला व जुळ्या मुलांचे प्राण वाचवले. त्यासाठी तब्बल ३७ प्रकारचे रक्तघटक द्यावे लागले हे विशेष..!

३७ रक्तघटक देऊन मातेसह जुळ्या मुलांना वाचवण्यात घाटीच्या डॉक्टरांना यश नाशिकमध्ये सासर, तर औरंगाबादेत माहेर असलेल्या प्रतिभा पवार (२८, रा. नारळीबाग) या बाळंतपणासाठी माहेरी आल्या हाेत्या. त्या स्वत: नाशिकमध्ये नर्स आहेत. प्रसूतीसाठी १३ जुलैला एका खासगी रुग्णालयात दाखल झाल्या होत्या. पण प्रसववेदना सुरू झाल्यानंतर त्यांचा रक्तदाब २१०/१०० झाला. सर्वसाधारण गरोदर महिलांचा रक्तदाब १४०/९० पेक्षा कमी असणे गरजेचे असते. रक्तदाब वाढल्यामुळे गर्भातील जुळी मुले आणि प्रतिभाचाही मृत्यू संभवत होता. म्हणून खासगी रुग्णालयाने त्यांना घाटीत रेफर केले. घाटीत आल्यानंतर स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. श्रीनिवास गडप्पा यांनी तातडीने प्राथमिक तपासणी केली. तेव्हा प्रतिभाचे लिव्हर (यकृत) निकामी झाल्याचे लक्षात आले. किडनीची (मूत्रपिंड) क्षमता पूर्णपणे मंदावली होती. रक्तदाबामुळे रक्तवाहिनी फुटून पोटात रक्तस्राव सुरू झाला होता. रक्तस्राव होत असताना प्रतिभाच्या शरीरातील रक्त गोठण्याची नैसर्गिक प्रक्रियाही संपलेली होती. त्यात तिला कावीळ झाल्याचे निष्पन्न झाले. शरीरातून मोठ्या प्रमाणात रक्त बाहेर पडत होते.

अतिशय गुंतागुंत वाढून माता आणि बाळाचा मृत्यू होणे अशा केसेसमध्ये सर्वसाधारण समजले जाते. पण डॉ. गडप्पा यांनी कृत्रिमरीत्या रक्तदाब कमी करण्याचे औषधी देऊन शस्त्रक्रियेची जोखीम पत्करली. दरम्यान, प्रतिभा बेशुद्ध पडली होती. घाटीत नेहमी ४० मिनिटांत सिझेरियन केले जाते. पण जिवंत राहण्यासाठी आवश्यक असलेले अवयवच क्षीण झाल्यामुळे प्रतिभाचे ऑपरेशन सुमारे अडीच तास चालल्याचे डॉ. गडप्पा यांनी सांगितले. डॉ. अनुराग सोनवणे, डॉ. रूपाली गायकवाड, डॉ. नेहा लोहिया, डॉ. पल्लवी उन्हाळे, डॉ. ऋतुजा पिपरे, डॉ. गौरी केनी, डॉ. संदीप मतकरी, भूलतज्ज्ञ डॉ. गायत्री तडवळकर, डॉ. स्नेहा मानधने, डॉ. संजय पाचोरे यांच्यासह सिस्टर सुनीता आसवले आणि रंजना घुगे यांनीही शस्त्रक्रिया यशस्वी करण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले.

खूप कमी वेळा अशी इमर्जन्सी येते
प्रतिभाला शस्त्रक्रियेदरम्यान ३७ प्रकारचे रक्त घटक दिले. त्यात २४ प्लाझ्मा, ६ प्लेटलेट्स, ६ लाल रक्तपेशी आणि १ वेगळ्या प्रकारची लाल रक्तपेशी द्यावी लागली. त्यानंतर २.१ आणि २.३ किलो ग्रॅमची दोन मुले झाली. त्यांना आम्ही नवजात शिशू कक्षात पाच दिवस ठेवले. प्रतिभाला ३ दिवस व्हेंटिलेटरचा सपोर्ट द्यावा लागला. आता ती जनरल वॉर्डात उपचार घेत आहे. खूप कमी वेळा अशी इमर्जन्सी येते. पण आम्ही कायम तत्पर असतो.’ - डॉ. श्रीनिवास गडप्पा, घाटी

कृत्रिमरीत्या रक्तदाब घटवून शस्त्रक्रिया
डॉ. गडप्पा म्हणाले, ‘अतिरक्तदाबामुळे अंधत्व, ब्रेन हॅमरेज, किडनी-लिव्हर फेल होणे, रक्तस्राव होऊन विविध प्रकारच्या रक्तपेशी कमी कमी होत जातात. अशा वेळी मधुमेह वाढतो, कावीळ होतो. विविध अवयव निकामी होतात. नैसर्गिकरीत्या रक्तदाब कमी होण्याची वाट पाहण्याऐवजी औषधी देऊन रक्तदाब कमी केला. शस्त्रक्रियेने बाळंतपण करून परिस्थिती थोडीफार नियंत्रणात आणली. या प्रकाराला वैद्यकीय परिभाषेमध्ये ‘प्री-इक्लामशिया’ असे म्हटले जाते. शस्त्रक्रिया करून प्रतिभाचा रक्तस्राव कमी करण्याचा प्रयत्न केला. मग हळूहळू रक्त गोठण्याच्या प्रक्रियेत सुधारणा झाली. दोन्ही बाळांना आणि प्रतिभाचे प्राण वाचवण्यात यश आले.

बातम्या आणखी आहेत...