आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेशन दुकान:गोरगरिबांची दिवाळी यंदा कडूच; राज्यात रेशनवरील साखर, रवा, डाळी, तेल गायब

औरंगाबाद / सदाशिव फुलेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • राज्यात साडेआठ कोटी नागरिक स्वस्त धान्यावर अवलंबून

दिवाळीसाठी “स्वस्त’ धान्य दुकानांमधून गरिबांसाठी माफक दरात मिळणारी साखर, रवा, डाळी व तेल यंदा गायब झाले आहे. खुल्या बाजारातील साखर, तेल आणि डाळींचे कडाडले भाव आणि रेशन दुकानातून बाद करण्यात आलेले हे घटक यामुळे राज्यातील गरिबांची दिवाळी यंदा कडूच होणार आहे. अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत समाविष्ट राज्यातील ८.५० कोटी नागरिक प्राधान्य कुटुंब गटातील असून रेशनवरून मिळणाऱ्या स्वस्त धान्यावर अवलंबून आहेत.

सोमवारपासून सुरू झालेल्या दिवाळीत घरोघरी फराळाचा खमंग दरवळ सुटला असला तरी दारिद्र््य रेषेखालील गोरगरीबांसाठी हा फराळ कठीण झाला आहे. दिवाळीच्या काळात रेशनवरून मिळणाऱ्या स्वस्त तेल, डाळी व साखरेमुळे या गरीब कुटुंबांची दिवाळी काही प्रमाणात “गोड’ होत असे. मात्र, यंदा रेशन दुकानांमधून यांचा पुरवठा न करण्यात आल्याने गरीब शिधापत्रिकाधारक दिवाळीच्या फराळासाठी खुल्या बाजारातील महागाईत होरपळला जात आहे.

आम्ही दिवाळी कशी साजरी करायची? गृहिणीचा सवाल
रेशन दुकानातून डाळ - साखरच गायब झाली आहे, आम्ही दिवाळी कशी साजरी करायची हॊ साहेब.. हा सवाल आहे सिल्लोड येथील शिक्षक कॉलनी वसाहतीमधील प्रतीक्षा ढाकणे या गृहिणीचा. लॉकडाऊनमुळे कोलमडलेल्या अर्थकारणामुळे मध्यमवर्गीय कुटुंबातील दिवाळीच्या जमा-खर्चाचा हिशेब चुकत असताना, गरीबांच्या घरातील दिवाळी मात्र रेशनवरील घटकांआभावी कोरडी झाल्याचे दिसते.

बेसन व मैैदा खरेदीची सक्ती
उलट, रेशन दुकानदारांकडून कार्डधारकांवर डाळीचे पीठ (बेसन ) , मैदा व रवा खरेदीची सक्ती केल्याच्या तक्रारी “दिव्य मराठी’ने जळगाव व नाशिकच्या उदाहरणांमधून उघडकीस आणल्या. रेशनवरील स्वस्त तेल, साखर दूर, दुकानदारांच्या या बेकायदा अटी-शर्तींमुळे कार्डधारकांना गहू-तांदूळही महागात पडल्याच्या तक्रारी आहेत.

मागणी नोंदवूनही दिले नाही
महागाईने उच्चांक गाठला असताना, रेशनवरून गरीबांना किमान डाळ-साखर मिळेल अशी आशा होती. लॉकडाऊनमध्ये डाळ देण्यात आली होती. मात्र, दिवाळीसाठी हे घटक न मिळाल्याने गरीब कुटुंबाची निराशा व हाल झाले आहेत. यास मागणी नसल्याचे सरकार सांगते, मात्र रेशनिंग कृती समितीच्या माध्यमातून आम्ही या घटकांसाठी मागणी नोंदवूनही त्याचा उपयोग झाला नाही. - गोरख आव्हाड, रेशनिंग कृती समिती

निधीअभावी अडचण, पुढल्या वर्षी प्रयत्न करू
हे घटक स्वस्त धान्य दुकानातून द्यावेत हे नियमाने बंधनकारक नाही, मात्र तत्कालीन परिस्थितीनुसार सरकार दिवाळीच्या काळात यांचा पुरवठा करीत असते. या वेळीही त्यासाठी आम्ही खूप प्रयत्न केले. मात्र, निधीअभावी ते शक्य झाले नाही. नियमानुसार देण्यात येणाऱ्या गहू व तांदळाचा पुरवठा वेळेत व्हावा हे आदेश देण्यात आले आहेत. दिवाळीसाठी किफायतशीर दरात अन्य घटक देण्याचा पुढील वर्षी प्रयत्न करू. - छगन भुजबळ, अन्न व नागरी पुरवठा मंत्री

- राज्यातील रेशन कार्डधारक कुटुंबे : १ कोटी ६२ हजार २५ हजार ८३० - रेशनवर अवलंबून असलेेले प्राधान्यक्रम नागरिक : ८ कोटी ५० लाख - एकूण रेशन दुकानांची संख्या : ५२ हजार ५५० - सक्रिय दुकाने : १८,४४३, गरीब कल्याण अन्न योजना कार्ड : १ कोटी ७ लाख ९१ हजार ३३२

बातम्या आणखी आहेत...