आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्लेशदायी:मराठवाड्यात आत्महत्यांचे सत्र; बीड, हिंगोली, परभणी जिल्ह्यांमध्ये घटना घडल्याने उडाली खळबळ

22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मालीपार गावातील घटना; आईवर उपचार सुरू

बुधवारी मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांमध्ये आत्महत्यांच्या घटनांनी खळबळ उडाली. बीडमधील माजलगावमध्ये घरगुती कारणावरून मुलाने आईवर वार करत स्वत: आत्महत्या केली, तर परभणीत सावकारांच्या जाचाला कंटाळून दोन तरुणांनी जीवन संपवले. तिसऱ्या घटनेत नापिकी आणि बँकेचे कर्ज फेडणे अशक्य झाल्याने तरुण शेतकऱ्याने मृत्यूला कवटाळल्याचे समोर आले. तिन्ही घटनांमध्ये पोलिसांत नोंद झाली आहे.

हिंगोली : कर्जाला कंटाळून शेतकऱ्याने मृत्यूला कवटाळले
वसमत | कोठारी येथे नापिकी व कर्जाला कंटाळून एका तरुण शेतकऱ्याने शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. याप्रकरणी बुधवारी कुरुंदा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली. बद्रीनाथ पांडुरंग नरवाडे (३०) असे शेतकऱ्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बद्रीनाथ यांच्या वडिलांच्या नावे अडीच एकर शेत आहे. या शेतावरच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत होता. या शेतावर त्यांनी कुरुंदा येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे ६० हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. या वर्षी त्यांनी शेतात सोयाबीनचे पीक घेतले होते. मात्र पेरणीनंतर पावसाने ओढ दिली तर त्यानंतर अतिवृष्टी यामुळे पिकाचे नुकसान झाले. त्यामुळे उदरनिर्वाह कसा करावा अन् पीक कर्ज कसे भरावे, असा प्रश्‍न त्यांच्यासमोर उभा राहिला होता.

त्यामुळे मागील काही दिवसांपासून ते अस्वस्थ होते. दरम्यान, मंगळवारी (दि.३१) सकाळी ते शेतात जातो असे सांगून घरून निघाले होते. मात्र बराच वेळ होऊनही ते घरी परतले नसल्याने त्यांच्या वडिलांनी शेतात जाऊन पाहिले, असा बद्रीनाथ यांचा मृतदेह झाडाला लटकलेला दिसून आला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर कुरुंदा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सुनील गोपीनवार, सहायक पोलिस उपनिरीक्षक ए. टी. वाळके यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. याप्रकरणी नीळकंठ नरवाडे यांच्या माहितीवरून कुरुंदा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. सहायक पोलिस उपनिरीक्षक वाळके पुढील तपास करीत आहेत.

परभणी : सावकारांच्या त्रासाला कंटाळून उचलले पाऊल
सोनपेठ | व्याजाचे पैसे परत करण्याच्या कारणावरून खासगी सावकारांकडून होत असलेल्या त्रासाला कंटाळून दोन युवकांनी आत्महत्या केल्याची घटना परभणी जिल्ह्यातील सोनपेठमध्ये घडली. याप्रकरणी चार जणांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला. सुनील वैजिनाथ पारवे व रितेश बंडू क्षीरसागर अशी आत्महत्या केलेल्या युवकांची नावे आहेत. ३० ऑगस्ट रोजी ते दोघे बेशुद्ध अवस्थेत मिळून आले होते त्यांना उपचाराखासाठी सोनपेठ प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले होते त्यानंतर पुढील उपचारासाठी अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी मंगळवारी मीरा बंडू क्षीरसागर यांच्या तक्रारीवरुन अजय घुगे, सुनिल मुंडे, हनुमंत घुगे (तिघे रा. सोनपेठ) व अन्य एकाने व्याजाच्या पैशांसाठी सुनील पारवे व रितेश क्षीरसागर यांना त्रास देत जीवे मारण्याची धमकी दिली होती. यामुळे त्यांनी विष घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी सोनपठ पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलिस अधिक तपास करत आहेत.

माजलगाव : आईवर हल्ला करून स्वत: घेतला गळफास
घरगुती भांडणातून मुलाने जन्मदात्या आईच्या मानेवर विळ्याने वार करत तिला जखमी केले. त्यानंतर घाबरलेल्या मुलाने शेतात जाऊन गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवार, १ सप्टेंबर रोजी दुपारी दीड वाजता तालुक्यातील मालीपारगाव येथे घडली. मुलाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या आईवर बीड जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. तालुक्यातील मालीपारगाव येथील पारूबाई मच्छिंद्र कदम ( वय ५०) या त्यांचा मुलगा बापू मच्छिंद्र कदम (वय ३० वर्ष) यांच्या नेहमीच घरगुती कारणावरून भांडण होत होते. बुधवार १ सप्टेंबर २०२१ रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास मायलेकात भांडणे सुरू झाली . या वेळी संतापलेला मुलगा बापू कदम याने घरातील विळा घेऊन आई पारूबाई यांच्या मानेवर सपासप वार केले.

या हल्ल्यात आई पारूबाई कदम या जखमी झाल्या. जखमी झालेल्या पारूबाई कदम यांना गावातील नागरिकांनी सुरुवातीला माजलगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी बीड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. पारूबाई यांच्यावर उपचार सुरू आहेत. आईवर हल्ला केल्यांनतर घाबरलेला मुलगा बापू कदम याने मालीपारगाव शिवारातील एका शेतात जाऊन गळफास घेत आत्महत्या केली.

बातम्या आणखी आहेत...