आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उष्मा वाढला, पण घात नाही!:पाच वर्षांच्या तुलनेत यंदा उन्हाळा जास्तच हॉट, पण राज्यामध्ये ‘उष्माघाता’चा एकही रुग्ण नाही

औरंगाबाद | रोशनी शिंपी22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

यंदा मार्च महिन्यापासूनच सूर्याने आग ओकण्यास सुरुवात केली. एप्रिलमध्येही अनेक शहरांचे तापमान ४० अंशांच्या वर आहे. मात्र तरीही एप्रिल अखेरीसही राज्यात उष्माघाताचा रुग्ण किंवा मृत्यू झालेला नाही, अशी माहिती समोर आली आहे. मागील पाच वर्षांची माहिती घेतली असता उष्माघाताने सर्वाधिक मृत्यू २०१६ मध्ये झाले आहेत. त्या वर्षी मे महिन्यात सर्वाधिक तापमान ४३.८ असे नोंदवले गेले. त्या तुलनेत यंदा मार्च महिन्यात पाऱ्याने ४० अंशांचा आकडा गाठला होता. तरीही सुदैवाने एकाही व्यक्तीला उष्माघातामुळे जीव गमावण्याची वेळ आली नाही. गेल्या दोन वर्षांत उष्माघाताने एकाचाही बळी नाही हे विशेष.

सार्वजनिक आरोग्य विभागात उष्माघाताच्या रुग्णांची नोंद केली जाते. सध्या राज्यातील १७ शहरांचा पारा ४० अंशांच्या वर आहे. मार्च २०२२ मध्ये २९१ उष्माघात संशयितांची नोंद झाली आहे. तर २१ जणांचा मृत्यूही उष्माघात संशयित म्हणून नोंदवण्यात आला आहे. त्यांच्यात उष्माघात झाल्यावर असतात तशीच लक्षणे असली तरीही हे मृत्यू उष्माघाताने झालेले नाहीत, असे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.

काय आहेत उष्माघाताची लक्षणे ?
लूज मोशन्स, उलट्या, शरीरातील पाणी कमी होणे आणि भयंकर ताप अशी लक्षणे दिसून येतात. मात्र, उष्माघात झालेल्या रुग्णाच्या शरीरातील पाणी अतिप्रमाणात कमी होते. याशिवाय रुग्णाचे अवयव निकामी होतात. रक्ताची तपासणी केल्यानंतरच उष्माघात झाल्याची खात्री होते.

दिव्य मराठी एक्सपर्ट व्ह्यू
हवेचा वेग वाढतो तेव्हाच उष्माघाताचा धाेका

पाच वर्षांच्या तुलनेत यंदा ऊन जास्त असले तरी तापमानात चढउतार नाही. त्यामुळे मानवी शरीर त्याला अॅडजस्ट होते. उन्हाची तीव्रता कमी-जास्त प्रमाण झाल्यास शरीरावर विपरित परिणाम होतो. याशिवाय मार्च, एप्रिल महिन्यात हवेचा वेग ३ ते ५ किलोमिटर प्रतितास आहे. मे महिन्यात हा वेग वाढून १० ते १२ किलोमीटर प्रतितास होईल. तीव्र उन्हासोबत हवेचा वेग वाढतो तेव्हा ती हवा शरीराला कोरडे करत जाते. यामुळे शरीरातील सोडियम आणि पोटॅशियम कमी होते. थोडक्यात उष्णतेची लाट येते, असे सोप्या भाषेत म्हटले जाते. अशा वेळी उष्माघात होण्याची शक्यता असते.
वसंत शिंपी, हवामान शास्त्रज्ञ, औरंगाबाद

रक्त चाचण्यांतून उष्माघात दिसलाच नाही
यंदा अति तीव्र उन्हाळा आहे. उष्माघाताचे रुग्ण येतील म्हणून आम्ही आधीच तयारीही केली. उलटी, जुलाब, ताप आणि शरीरातील पाणी कमी झालेल्या प्रत्येक रुग्णाच्या अतिशय बारीक नोंदी आम्ही करतो. पण, रक्तचाचण्या उष्माघात असल्याचे दाखवत नाहीत. आतापर्यंत जे रुग्ण तपासले त्यांना किडनी, हृदयाचे आजार अशी लक्षणे दिसून आली. उन्हाळ्यात थंड पिण्याची तीव्र इच्छा होते. पण, बर्फ कटाक्षाने टाळायला हवा. बाहेरचे खायला नको.
डॉ. मीनाक्षी भट्टाचार्य, औषध वैद्यकशास्त्र प्रमुख, ओैरंगाबाद.

मंगळवारचे कमाल तापमान : वर्धा ४४.५, चंद्रपूर ४४.४, अकोला ४४.२, ब्रह्मपुरी ४४.२, मालेगाव ४४, परभणी ४३.८, अमरावती ४३.६, गोंदिया ४३.५, नागपूर ४३.५, यवतमाळ ४३.५, वाशिम ४२.५, नांदेड ४२.४, सोलापूर ४२, उस्मानाबाद ४१.५, बुलडाणा ४१.४, गडचिरोली ४१.४, औरंगाबाद ४०.२, सातारा ३८.६, सांगली ३८.२, नाशिक ३७.३.

पावसाची शक्यता: विदर्भातील अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह वादळ आणि हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.

बातम्या आणखी आहेत...