आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सावित्रीची लेक:प्र-कुलगुरूंच्या स्वीय सहायक सुनीता अंकुश यांनी 35 वर्षांच्या नोकरीत केले बीए, एमए अन् पीएचडी

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्र-कुलगुरूंच्या स्वीय सहायक डॉ. सुनीता राजेंद्र अंकुश ३५ वर्षांच्या सेवेनंतर शनिवारी निवृत्त झाल्या. नाेकरीच्या कार्यकाळात त्यांनी विद्यापीठातून ज्ञानाची मोठी शिदोरी सोबत घेतली आहे. बारावीनंतर नोकरी लागली. पण उच्च शिक्षण घेण्याच्या जिद्दीने त्यांनी पदवी, पदव्युत्तर पदवी एवढेच नव्हे, तर समाजशास्त्रात पीएचडी संशोधनही केले.

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या क्रांतीमुळे समस्त स्त्रियांना शिक्षण घेण्याचे बळ मिळाले. शिक्षणामुळेच आत्मभान प्राप्त होते हे ओळखलेल्या सुनीता अंकुश यांनी सावित्रीबाईंच्या शैक्षणिक क्रांतीचा हाच संदर्भ घेत सेवेत असताना शिक्षणाचा मोठा पल्ला गाठला. जानेवारी-१९८७ दरम्यान त्या रुजू झाल्या होत्या. त्या वेळी त्यांनी लघुलेखकासह बारावीपर्यंतचे शिक्षण घेतले होते.

नोकरी लागल्यानंतर त्यांचे लग्न बीएसएनएलचे अभियंते राजेंद्र अंकुश यांच्याशी झाले. वैवाहिक जीवन आणि नोकरी अशी कसरत करत त्यांनी उच्च शिक्षण घेण्याचा ध्यास घेतला. विद्यापीठ प्रशासनाची पूर्वपरवानगी घेऊन सेवेत असताना शिक्षण घेतले. १९९२ दरम्यान बीए, तर १९९७ दरम्यान समाजशास्त्रात एमए केले. पुढे २००१ मध्ये त्यांनी पीएचडीसाठी नोंदणी करून साडेपाच वर्षांत ‘शासकीय कार्यालयात काम करणाऱ्या महिलांच्या समस्या : एक चिकित्सक अभ्यास’ या विषयात संशोधन केले. डॉ. स्मिता अवचार यांनी त्यांना मार्गदर्शन केले. एवढ्यावरच सुनीता थांबल्या नाहीत, तर त्यांनी ‘उंबरठ्याबाहेरील स्त्रियांचे जग’ आणि ‘तिमिरातील दीपज्योती’ हे दोन ग्रंथही लिहिले आहेत. राष्ट्रीय स्तरावरील जर्नलमध्ये त्यांचे १५ शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत.

मुक्त विद्यापीठातून एमफिल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन सुनीता यांना नाशिकच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने गाइडशिपही दिली होती. त्यांनी एमफिल करणाऱ्या ४ विद्यार्थ्यांना मार्गदर्शनही केले. मात्र, कामाच्या व्यापामुळे त्यांनी गाइडशिप सोडून दिली. एमजीएमच्या नर्सिंग कॉलेजमध्ये शनिवार आणि रविवारी अध्यापन केले. त्यांचा मोठा मुलगा सौरभ पुण्यात सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे, तर धाकट्या मुलाने एमबीए केले आहे.

बातम्या आणखी आहेत...