आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहिंगोली जिल्ह्यात चोरी घरफोडी गुन्ह्यातील संशयीत गुन्हेगारांना पकडून पोलिस अधीक्षक राकेश कलासागर यांनी सोमवारी चांगली धुलाई केली. जिल्ह्यात चोरी, घरफोडीच्या घटनांमध्ये आढळून आल्यास याद राखा अशी तंबीही या गुन्हेगारांना दिली. पोलिस अधीक्षकांच्या या भूमिकेमुळे जिल्ह्यातील अट्टल गुन्हेगारांसोबत अवैध व्यवसाय चालकांचे धाबे दणाणले आहेत.
हिंगोली जिल्ह्यात मागील काही वर्षांमध्ये अवैध व्यवसाय सुरू होते. याशिवाय चोरी, घरफोडी या घटना देखील घडल्या आहेत. मात्र पोलिस अधीक्षक योगेश कुमार रुजू झाल्यानंतर त्यांनी जिल्ह्यातील अवैध व्यवसायांवर अंकुश बसवला. ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये अवैध व्यवसाय आढळून येतील त्याठिकाणी बीट जमादारांवर कारवाई केली. मात्र त्यानंतरही चोरून-लपून अवैध व्यवसाय सुरू होते.
दरम्यान पोलिस अधीक्षक योगेश कुमार यांची बदली झाल्यानंतर हिंगोली पोलीस दलाचा पदभार पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी हाती घेतला. नवीन पोलीस अधीक्षक आल्यानंतर अवैध व्यवसाय सुरू होतील असा अंदाज बांधला जाऊ लागला होता. मात्र राकेश कलासागर यांनी मागील आठ दिवसात जिल्ह्याचा संपुर्णपणे अभ्यास केला. स्थानिक गुन्हे शाखा व इतर विभागामार्फत जिल्ह्यातील परिस्थितीची माहिती घेतली.
त्यानंतर आज जिल्ह्यात चोरी व इतर गुन्ह्यांमध्ये असलेल्या अट्टल गुन्हेगारांना हजर करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले. त्यावरून गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जगदीश भंडरवार, उपनिरीक्षक शिवसांब घेवारे, किशोर पोटे यांच्यासह पथकाने जिल्हाभरातील सुमारे ५० पेक्षा अधिक गुन्हेगारांना पोलीस अधीक्षकांन समोर हजर केले.
त्यानंतर पोलीस अधीक्षक कलासागर यांनी या गुन्हेगारांची चांगलीच हजेरी घेतली. या गुन्हेगारांची चांगली धुलाई करत जिल्ह्याभरात चोरीच्या घटनामध्ये आढळून आल्यास याद राखा अशी तंबीही दिली. पोलीस अधिक्षक कलासागर यांनी अट्टल गुन्हेगारांना चांगलाच हात दाखवला.त्यामुळे आता जिल्ह्यातील अवैध व्यवसाय सुरू होतील या आशेवर असलेल्या अवैध व्यवसाय चालकांचे धाबे दणाणले आहेत. तर आजच्या घटनेवरून पोलीस अधीक्षक कलासागर यांनीही आपले मनसुबे स्पष्ट केले आहेत. दरम्यान पुढील दोन दिवसात अवैध व्यवसाय करणाऱ्या लोकांवरही संक्रांत येणार असल्याचे बोलले जात आहे
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.