आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद:अंगणवाडी बालकांना निकृष्ट डाळीचा पुरवठा, सखोल चौकशी व्हावी

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद जिल्ह्याच्या अंगणवाडीतील बालकांना पूरक पोषण आहार योजनेअंतर्गत निकृष्ट दर्जाच्या डाळी वाटप करण्यात आल्या आहेत, या डाळी खाऊन मुलांचे पोषण होईल का असे जिल्हा परिषद आरोग्य सभापती अविनाश गलांडे पाटील यांनी म्हटले आहे.

गलांडे पाटील यांनी सांगितले की, जिल्ह्यातील अंगणवाडीत 0 ते 3 वयोगटातील बालकांसाठी पूरक पोषण आहार पुरवठा केला जातो. हा आहार पुरवठा करण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण सहकारी संस्था मुंबई यांनी तीन ठेकेदारांना नियुक्त केलेले आहेत. त्यांच्यामार्फत राज्यभरात या पोषण आहाराचा पुरवठा होतो. पूरक पोषण आहारअंतर्गत मसूर डाळ, मूग डाळ, तेल, मीठ, मिरची, हळद, चना, गहू आणि तांदूळ आदी साहित्य वाटप केले जाते.

मागील महिन्यात पुरवठादाराने अंगणवाड्याना दिलेली मसूर डाळ, मूग डाळ अत्यंत निकृष्ट असल्याच्या तक्रारी ग्रामीण भागातील महिलांनी केल्या होत्या, या तक्रारींच्या अनुषंगाने मंगळवारी सकाळी वैजापूर तालुक्यातील महागाव येथील अंगणवाडी क्रमांक-३ मध्ये जाऊन पोषण आहाराच्या धान्याची तपासणी केली. यावेळी मसूर डाळ व मूग डाळीचे पाकिटे फोडून तपासली असता, मूग डाळ अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याचे दिसून आले. शिवाय या पाकिटावर पुरवठादाराचे नाव, एक्सपायरी डेट, मॅन्युफॅक्चरिंग डेट, बॅच नंबर आधी कोणतीही माहिती नमूद नसल्याचे दिसून आले. हा प्रकार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या समोर आणले.

जिल्ह्यात 3510 अंगणवाड्या असून, यात शून्य ते 3 वयोगटातील 1,25,775 लाभार्थी आहेत. सन 2020-21 या वर्षात ठेकेदारांना 28 कोटी 77 लाख 13 हजार 600 रुपयाचे बिल अदा करण्यात आल्याचे ते म्हणाले.

सखोल चौकशी व्हावी

जिल्ह्यात कुपोषणाचे प्रमाण शून्य करण्यासाठी पोषण आहार योजना राबवली जाते. बालकांना चांगल्या दर्जाचा सकस आहार मिळाला पाहिजे. अशा निकृष्ट दर्जाचे धान्य पुरवठा करून निष्पाप बालकांच्या आरोग्याशी खेळण्याचा हा घृणास्पद प्रकार आहे. या घटनेची प्रशासनाने सखोल चौकशी करावी. संबंधित पुरवठादाराला काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी आम्ही केली आहे. जि प आरोग्य सभापती गलांडे पाटील

निकृष्ट धान्य वाटप थांबवा
पूरक पोषण आहारअंतर्गत मुगडाळ निकृष्ट असल्याच्या तक्रार गंगापूर तालुक्यातुन माझ्याकडे आली होती. निकृष्ट धान्य वाटप थांबवा, या घटनेची सखोल चौकशी करा, असे आदेश उप मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिलेत.-महिला व बाल कल्याण सभापती अनुराधा चव्हाण यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...