आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिवसेना उपनेते, जालन्याचे माजी मंत्री अर्जुन खोतकर शिंदेसेनेत सामील होण्याची चर्चा गेल्या आठ दिवसांपासून सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत रविवारी (३१ जुलै) औरंगाबाद, सिल्लोडमध्ये मेळावे, रॅली होणार आहे. या कार्यक्रमात उपस्थित राहून खोतकर शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे सांगितले जाते. मात्र, शुक्रवारी ‘तुम्ही शिंदे गटात सामील होणार का?’ असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता ‘आताच याबाबत मी काहीही बोलणार नाही,’ एवढेच उत्तर त्यांनी दिले. त्यांची ही सावध भूमिका ‘नाही मी बोलत ... नाथा’ या संगीत मानापमान नाटकातील लोकप्रिय नाट्यगीताची आठवण करून देत आहे.
जूनमध्ये अर्जुन खोतकर यांच्यावर ईडीची वक्रदृष्टी पडली. त्यांच्या सुमारे १०० कोटींच्या मालमत्तेवर टाच आणली गेली. तेव्हापासूनच खोतकर अस्वस्थ आहेत. मागील आठवड्यात औरंगाबादेत झालेल्या आदित्य ठाकरे यांच्या मेळाव्याला व्यासपीठावर हजेरी लावून मी ठाकरेंशीच एकनिष्ठ असल्याचे त्यांनी सांगितले होते. मात्र त्यानंतर दोनच दिवसांत दिल्लीत जाऊन त्यांनी भाजप नेते रावसाहेब दानवे यांच्याशी गुफ्तगू केले. आता दोन दिवसांपूर्वी खोतकर आणि माजी मंत्री अब्दुल सत्तार एकत्रपणे दिल्लीला गेले. तेथे मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी तासभर चर्चा केली. त्यामुळे आता तर खोतकर शिंदे गटात जाणार असल्याचे ठामपणे सांगितले जात आहेत. शुक्रवारी खोतकर, सत्तार व बीडचे माजी मंत्री प्रा. सुरेश नवले हे दिल्लीतून विमानतळावर आले. पत्रकारांनी पुन्हा विचारणा केली. त्यावर खोतकरांनी ‘मी शिंदे गटात सामील होण्याबाबत इथे काहीही बोलणार नाही. जे काही सांगायचे ते जालन्यातच,’ एवढे उत्तर त्यांनी दिले.
परभणीचे माजी खासदार सुरेश जाधवही शिंदेसेनेत जाणार
परभणीचे माजी खासदार सुरेश जाधव हेही रविवारी औरंगाबादेत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. जाधव हे १९९६ आणि १९९९ मध्ये परभणीचे शिवसेना खासदार होते. ते मूळचे गंगाखेडचे आहेत. काही वर्षांपासून ते राष्ट्रवादीत होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.