आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगोली:हिंगोलीत स्वाभीमानीच्या कार्यकर्त्यांकडून कृषी अधिकारी कार्यालयात खुर्च्यांची तोडफोड, बियाणे उगवणीच्या तक्रारीवर उडवा उडवीची उत्तरे

हिंगोली2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली जिल्हयात सोयाबीन बियाणे उगवणीबाबत आलेल्या तक्रारींच्या चौकशीबाबत कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून उडवा उडवीची उत्तरे दिली जात असल्याने संतप्त झालेल्या स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयात मंगळवारी (ता. २३) दुपारी खुर्च्यांची तोडफोड केली. अचानक झालेल्या या प्रकारामुळे अधिकारी मात्र अवाक्‌ होऊन पाहात होते.

हिंगोली जिल्हयात सोयाबीन बियाणे उगवले नसल्याच्या मोठ्या संख्येने तक्रारी केल्या जात आहेत. त्यानुसार उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयाच्या मार्गदर्शनाखाली बियाणे तक्रार निवारण समिती नियुक्त करण्यात आली आहे. मात्र तक्रारींचा वाढता ओघ लक्षात घेता वेळेत तक्रारींची चौकशी होऊन पंचनामा करणे अशक्य होते. त्यामुळे आज स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब अडकिणे, युवा जिल्हाध्यक्ष नामदेव पतंगे, सुभाषराव गाडगे, बापुराव गरड, पराग अडकिणे, दिगंबर गावंडे, बेगाजीराव गावंडे, ऋषीकेश बर्वे, नारायण कदम, गोपिनाथ बहादुरे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी आज दुपारी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालय गाठले. यावेळी त्या ठिकाणी बैठक सुरु होती. मात्र त्यानंतरही संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कार्यालयात जाऊन चौकशी करण्यास सुरवात केली. बियाणे उगवणीबाबत मोठ्या संख्येने तक्रारी प्राप्त होत असून त्याचे पंचनामे कधी होणार, एका दिवशी तीन ते चार ठिकाणीच पंचनामे करता येतील. त्यामुळे पंचनामे करण्यासाठी अतिरिक्त कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी अशी मागणी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी लाऊन धरली. मात्र अधिकाऱ्यांकडून पाहुत, करूत अशी उडवा उडवीची उत्तरे मिळत असल्याने संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी कार्यालयातील खुर्च्यांची तोडफोड केली. त्यानंतर घोषणाबाजी करून पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कार्यालयातून काढता पाय घेतला. या प्रकारामुळे कार्यालयात एकच गोंधळ उडाला होता. त्यानंतर या कार्यकर्त्यांनी महाबीज कार्यालयासमोर जाऊन घोषणाबाजी केली.

यापुढे तीव्र आंदोलन करणार ः नामेदव पतंगे, युवा जिल्हाध्यक्ष स्वाभीमानी शेतकरी संघटना

जिल्ह्यातील शेतकरी सोयाबीन बियाणांची उगवण न झाल्याने अडचणीत सापडले आहेत. दुबार पेरणी करावी लागणार असल्याने आता पैसे कसे उभारावे असा प्रश्‍न शेतकऱ्यांसमोर उभा आहे. मात्र कृषी अधिकारी कार्यालयाकडून कुठल्याही प्रकारचा ठोस निर्णय घेतला जात नसल्याने कार्यालयात खुर्च्यांची तोडफोड करून घोषणाबाजी केली. यापुढे आणखी तिव्र आंदोलन केले जाणार आहे.

बातम्या आणखी आहेत...