आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरसगट पिकविमा देण्याच्या मागणीसाठी स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गुरुवारी ता. ७ जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. जो पर्यंत पिकविमा मिळणार नाही तो पर्यंत आंदोलन सुरुच ठेवणार असल्याची भुमीका यावेळी पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे.
हिंगोली जिल्हयात यावर्षी खरीप हंगामात तब्बल ३ लाख शेतकऱ्यांना सोयाबीन व इतर पिकांचा विमा भरला होता. त्यानंतर जिल्ह्यात तब्बल १२४ टक्के पाऊस झाला आहे. या पावसामुळे जिल्हयाचे प्रमुख पिक समजल्या जाणाऱ्या सोयाबीनचे मोठे नुकसान झाले. शेतकऱ्यांना एकही एक पोते देखील उतारा आला नाही. त्यामुळे लागवडीचा खर्चही निघाला नाही. त्यानंतर आता शेतकऱ्यांचे लक्ष पिकविम्याकडे लागले आहे.
मात्र ज्या शेतकऱ्यांनी नुकसानीबाबत विमा कंपनीला माहिती दिली अशा ४० हजार शेतकऱ्यांना विमा मिळाल्याचे कृषी विभागाकडून सांगितले जात आहे. मात्र उर्वरीत २.६० लाख शेतकऱ्यांचे काय असा प्रश्न स्वाभीमानी शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. पिकविम्याच्या मागणीसाठी संघटनेच्या वतीने पंधरा दिवसांपुर्वी आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी १५ दिवसांत तोडगा काढण्याचे आश्वासन कृषी खात्याकडून देण्यात आले. मात्र त्यावर अद्यापही निर्णय झाला नाही.
याप्रकारामुळे संतप्त झालेले स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी माधवराव गाडे, युवा जिल्हाध्यक्ष नामदेव पतंगे, नारायण सावके, दीपक सावके, लिंबाजी सावंत, विठ्ठल देशमुख, बाबुराव मगर, दत्तराव खंदारे, रामदास पडघन, झनक भिवाजी यांच्यासह सुमारे ३० शेतकऱ्यांनी आज सकाळी ११ वाजल्या पासून जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी विजय लोखंडे यांच्या दालनात ठिय्या आंदोलन सुरु केले. जो पर्यंत पिकविमा मिळणार नाही तो पर्यंत आंदोलन सुरु ठेवले जाईल अशी भुमीका पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे. या आंदोलन काळात अनुचीत प्रकार घडू नये यासाठी कृषी विभागाने पोलिस कर्मचाऱ्यांना पाचारण केले आहे. सध्या कृषी कार्यालयात आंदोलन सुरुच आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.