आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागरवारे क्रीडा संकुलावर सुरू असलेल्या मसिआ टी-20 क्रिकेट स्पर्धेत प्रोनेक्स एमआर इलेव्हन संघाने विजय मिळवला. शुक्रवारी झालेल्या लढतीत एमआरने डॉक्टर असोसिएशन संघावर 8 गडी राखून मात केली. या सामन्यात अब्दुल कय्युम सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.
नाणेफेक जिंकून एमआरने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना डॉक्टर संघाने 20 षटकांत 9 बाद 152 धावा उभारल्या. या संघाची सुरुवात खराब झाली. सलामीवीर गिरिष गाडेकर, ज्ञानेश्वर बनकर व संदीप सानप हे आघाडीचे तीन फलंदाज भोपळाही फोडू शकले नाही. अल्ताफ शेखने 15 चेंडूंत 3 चौकार व 1 षटकारासह 23 धावा केल्या. रामेश्वर दौडचे अर्धशतक सामना गमावल्याने व्यर्थ ठरले. त्याने 36 चेंडूंत 5 चौकार व 3 षटकार खेचत सर्वाधिक 57 धावा ठोकल्या. अल्ताफ व रामेश्वरने चौथ्या गड्यासाठी 75 धावांची अर्धशतकी भागीदारी केली. त्यानंतर आलेल्या मयुर जगंलेने 40 चेंडूंत 3 षटकार खेचत 47 धावा काढल्या. कर्णधार राजेश चौधरीने 13 धावा केल्या. एमआरकडून राहुल भालेराव, विनोद यादव व कर्णधार शोएब शेख यांनी प्रत्येकी तीन तीन गडी बाद केले.
कय्युमचे शानदार अर्धशतक
प्रत्युत्तरात एमआर इलेव्हनने 19.4 षटकांत 2 गडी गमावत विजयी लक्ष्य गाठले. यात सलामीवीर मो. उमर अब्बासने 28 चेंडूंत 5 चौकारांसह 28 धावा केल्या. दुसरा सलामीवीर कय्युमने 58 चेंडूंचा सामना करताना 7 चौकार व 1 षटकार खेचत सर्वाधिक 79 धावांची अर्धशतकी खेळी केली. सईद फरहानने 32 चेंडूंत 2 चौकारांच्या मदतीने नाबाद 35 धावांची विजयी खेळी केली. विनाेद यादव 6 धावांवर नाबाद राहिला. मयुर जंगले व संतोष बनकरने प्रत्येकी एक एक बळी घेतला.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.