आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खंडपीठाची अपेक्षा:बेकायदा नळांविरोधात कारवाई, दंड वसूल करा

औरंगाबाद14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबादकरांना पुरेसे व नियमित पाणी मिळावे यासाठी योजनांवर काम तर करावेच. त्यासोबतच अनधिकृत नळ कनेक्शनविरोधात तातडीने कारवाई करावी. अशा नळधारकांना दंड ठोठावून ते नियमित करण्यावर भर द्यावा, अशा सूचना खंडपीठाचे न्या. रवींद्र घुगे व न्या. ए. आर. पेडणेकर यांनी सोमवारी मनपा प्रशासनाला दिल्या. तसेच या कारवाईसंदर्भात वेळोवेळी अहवाल देण्याचे निर्देशही दिले. शहरातील पाणी प्रश्नावर दाखल जनहित याचिकेची सुनावणी झाली. मागच्या सुनावणीत खंडपीठाने नवीन पाणीपुरवठा योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या अध्यक्षतेखाली ७ सदस्यीय समिती स्थापन करण्याचे आदेश दिले होते. तसेच दर १५ दिवसांनी या समितीने आढावा घेऊन न्यायालयास अवगत करावे, असेही मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्या. रवींद्र घुगे यांनी सांगितले होते. त्यानुसार, सोमवारी समितीने पहिल्या बैठकीची माहिती न्यायालयास दिली. पुढील सुनावणी १० ऑगस्टला होणार आहे.

ठेकेदाराला सूचना : मुख्य सरकारी वकिल ज्ञानेश्वर काळे यांनी सांगितले की, विभागीय आयुक्तांनी पैठण रोडवरील जलवाहिनीच्या कामाची पाहणी केली. ठेकेदाराला कामाची गती वाढवण्याच्या सूचना दिल्या. महावितरणच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन पाइपलाइनच्या कामातील विजेच्या खांबाचे अडथळे दूर करण्यास सांगितले. जलवाहिन्यांचा पुरवठा पुरेसा होत नाही, तो वाढवण्याच्या सूचना ठेकेदारास दिल्या आहेत. तसेच जुन्या पाणीपुरवठा योजनेतील पाइप बदलण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी निधी मंजूर करण्याची घोषणा केल्याचेही सांगण्यात आले.

बेकायदा नळ जोडण्या नियमित करणे सुरू
मनपाच्या वतीने अॅड. संभाजी टोपे म्हणाले, आठ दिवसांचा पाणीपुरवठा चार दिवसांवर आणला आहे. बेकायदा नळांविरोधात मोहीम सुरू आहे. दंड वसुली करून जोडण्या नियमित करण्याचा प्रयत्न आहे. कनेक्शन तोडणे हा शेवटचा पर्याय असेल. शहराला २१६ एमएलडी पाण्याची गरज आहे परंतु तेवढे पाणी मिळत नसल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वतीने अॅड. विनोद पाटील यांनी काम पाहिले.

बातम्या आणखी आहेत...