आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माजी महापौर घोडेले यांची मागणी:निविदेविना थेट कंत्राट देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा, एजन्सीची नियुक्तीही रद्द करा

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

निविदा न काढता स्मार्ट सिटीतून कोट्यवधी रुपयांचे कंत्राट खासगी एजन्सीला देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, संबंधित एजन्सीची नियुक्ती तत्काळ रद्द करावी, या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, खासगी एजन्सीची नेमणूक त्वरित रद्द करावी, दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी माजी महापौर नंदकुमार घोडेले, माजी नगरसेवक भाऊसाहेब जगताप यांनी प्रशासनाकडे केली आहे. सीईओ डॉ. अभिजित चौधरी यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

केंद्र शासनाने २०१५ मध्ये देशभरातील १०० शहरांची स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी निवड केली. त्यामध्ये औरंगाबादचाही समावेश आहे. स्मार्ट सिटीच्या जाहिरातींसाठी खासगी एजन्सीची नियुक्ती करून कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी करा, असे शासनाने कुठेही म्हटले नाही. असे असतानाही औरंगाबाद स्मार्ट सिटी प्रशासनाने जाहिरातींसाठी मीडिया हाऊस या खासगी एजन्सीची नियुक्ती एका साध्या अर्जाच्या आधारावर केली. एजन्सीने स्मार्ट सिटीकडे १७ डिसेंबर २०२० रोजी अर्ज केला. या अर्जाच्या आधारावर दुसऱ्या दिवशी म्हणजे १८ डिसेंबर २०२० रोजी एजन्सीची नेमणूक करण्यात आली. अवघ्या अडीच पानांच्या साध्या कागदावर करारही करण्यात आला. मागील दोन वर्षांत मीडिया हाऊसला २ कोटींहून अधिक रक्कम जाहिरातींच्या नावावर देण्यात आली. माहिती अधिकारात ही बाब उघडकीस आल्याचे स्पष्ट झाले.

प्रकरणाची चौकशी करण्याचे सीईओंचे आदेश विविध वर्तमानपत्रांमध्ये याबाबतचे वृत्त प्रकाशित होताच सीईओ डाॅ. अभिजित चौधरी यांनी चौकशी करण्याचे आदेश उपमुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ जोशी यांना दिले. दरम्यान, मीडिया हाऊसची नियुक्ती त्वरित रद्द करावी, दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, या मागण्यांवर काय कारवाई होते याकडे लक्ष लागले आहे.

बातम्या आणखी आहेत...