आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
कळमनुरी तालुक्यातील हातमाली येथे फेरफार मध्ये दुरुस्ती करण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच मागणाऱ्या सेलसुरा सज्जाच्या तलाठ्या सह कळमनुरी तहसील मधील एका कोतवालास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सोमवारी (ता. २१) रात्री उशिरा ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी कळमनुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कळमनुरी तालुक्यातील सेलसुरा येथील राजेंद्र गुलाबराव भोयर यांच्या मालकीची हातमाली शिवारातील गट नंबर १४० व गट नंबर ११८ मध्ये शेत जमीन आहे. या शेतजमिनीच्या फेरफार मध्ये दुरुस्ती करून देण्याची मागणी भोयर यांनी सेलसुरा सज्याचे तलाठी यांच्याकडे केली होती. यावेळी तलाठी बेले व तहसील कार्यालयात कार्यरत असलेला कोतवाल शेख हमीद याने फेरफार दुरुस्ती करून देण्यासाठी व त्या दुरुस्तीस तहसील कार्यालयातून ओळखीने मंजुरी मिळवून देण्यासाठी पाच हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली.
मात्र भोयर यांनी या प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. त्यावरून लाचलुचपत असे प्रभारी उपाधिक्षक नितीन देशमुख, पोलीस निरीक्षक ममता अफूने, जमादार विजय उपरे, अवि कीर्तनकार, रुद्रा कबाडे, प्रमोद थोरात, तानाजी मुंडे, संतोष दुमाने, विनोद देशमुख, ज्ञानेश्वर पंचलिंगे यांच्या पथकाने पडताळणी केली. यामध्ये त्यांनी पाच हजार रुपयांची मागणी केल्याचे स्पष्ट झाले.
त्यानंतर आज रात्री उशिरा राजेंद्र भोयर यांनी कळमनुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. यावरून पोलिसांनी तलाठी बेले व कोतवाल शेख हमीद यांच्याविरुद्ध लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होतात लाचलुचपतच्या पथकाने दोघांनाही ताब्यात घेतले आहे. लाचलुचपत विभागाचे प्रभारी उपाधीक्षक नितीन देशमुख पोलीस निरीक्षक ममता अफुने पुढील तपास करीत आहेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.