आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बुद्धिबळ स्पर्धा:आजारी असतानानी तनिषा बाेरामणीकरने जिंकले वेस्टर्न एशिया युथ चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक

औरंगाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबादची युवा आंतरराष्ट्रीय खेळाडू तनिषा बोरामणीकरने पुन्हा एकदा आपल्या तल्लख बुद्धीने मोठे यश मिळवले. विशेष म्हणजे ताप आलेला असतानाही तनिषाने उकुलहास (मालदीव) येथील वेस्टर्न एशिया युथ चॅम्पियनशिपमध्ये शानदार कामगिरी करत कांस्यपदक आपल्या नावे केले. स्पर्धेत तनिषाला दुसरे मानांकन देण्यात आले होते. तिने 16 वर्षांखालील गटात भारताचे प्रतिनिधित्व करत 9 फेऱ्यांच्या या स्पर्धेत 7.5 गुणांची कमाई करत तिने हे पदक जिंकले. या स्पर्धेत जगभरातून 250 खेळाडूंनी सहभाग घेतला होता.

अवघ्या अर्धा गुणांनी सुवर्ण हुकले

स्पर्धेत दोन फेऱ्यामध्ये बरोबरीत राहिल्याने तनिषाचे सुवर्णपदक अवघ्या अर्धा गुणांनी हुकले. पहिल्या लढतीत तिने श्रीलंकेच्या विक्रमराथने विरुद्ध बरोबरी राखली. त्यानंतर चौथ्या फेरीत उझबेकिस्तानच्या अव्वल मानांकित ओमानोव्हा उमिदाशी आणि पाचव्या फेरीत कझाकिस्तानच्या अयाउलिम काल्डरोवा सोबत सामना ड्रॉ खेळला. या तिन्ही डावात तिला अर्धा गुणांवर समाधान मानावे लागले, त्यामुळे ती तिसऱ्या स्थानावर राहिली.

डब्ल्यूसीएम पदवी मिळणार, दहावीत 98 टक्के गुण

स्पर्धेत केलेल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे तनिषाला फिडेकडून वुमेन कॅडिडेट मास्टर (डब्ल्यूसीएम) पदवी प्रदान करण्यात येईल. तिचे भारताकडून प्रतिनिधीत्व करताना एकूण पाचवे आंतरराष्ट्रीय पदक ठरले. दुसरीकडे, तनिषा खेळाबरोबर अभ्यासदेखील खुप हुशार आहे. गत आठवड्यात लागलेल्या दहावी बोर्डाच्या निकालात तिने 98.2 टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झाली आहे. तिच्या यशाबद्दल महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे सचिव निरंजन गोडबोले, औरंगाबाद बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष आमदार अतुल सावे, महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे सहसचिव हेमेंद्र पटेल यांनी अभिनंदन केले.