आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्धवसेनेत गटबाजी:मनपात बैठकीपूर्वी दहा मिनिटे आधी दानवेंनी पीएमार्फत निरोप पाठवल्याने तनवाणी संतप्त

औरंगाबाद25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • तनवाणींकडे शहराची पूर्ण जबाबदारी, त्यांनाच वगळत दानवेंची बैठक
  • तनवाणी बैठकीकडे फिरकलेच नाहीत; खैरे म्हणाले, अंबादास दानवे वारंवार अपमान करत आहेत
  • ‘मातोश्री’वर शपथपत्रांवरून खैरे-तनवाणींनी केलेल्या कोंडीची परतफेड दानवेंनी मनपात केल्याची चर्चा

दोन आठवड्यांपूर्वी माजी आमदार किशनचंद तनवाणी यांची उद्धवसेना जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती झाली. त्यांच्याकडे संपूर्ण औरंगाबाद शहराचा कार्यभार देण्यात आला. त्यात कुणीही हस्तक्षेप करणार नाही, असे खुद्द उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. तरीही त्यांना ठरवून वगळत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी गुरुवारी (३ नोव्हेंबर) महापालिका प्रशासक डाॅ. अभिजित चौधरी यांची भेट घेतली. अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेऊन िवविध सूचना केल्या. तनवाणींनी वरिष्ठांकडे तक्रार केलीच तर त्यात आपली बाजूही भक्कम असावी म्हणून बैठक सुरू होण्यापूर्वी दहा मिनिटे आधी तनवाणींना पीएमार्फत बैठकीविषयी निरोप देण्याची काळजी दानवे यांनी घेतली. यामुळे तनवाणी संतप्त झाले. ते बैठकीकडे फिरकलेच नाहीत. दरम्यान, तनवाणी यांना जिल्हाप्रमुखपदाची सूत्रे मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे उद्धवसेनेचे नेते, माजी खासदार चंद्रकांत खैरे दानवेंवर अधिकच भडकले आहेत. अंबादास ठरवून वारंवार अपमान करत आहेत, असे ते म्हणालेे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेनेत आतापर्यंत अशी प्रथा होती की, कोणत्याही वरिष्ठ नेत्याला महापालिकेत काहीही काम असेल तर तो मनपाशी संबंधित पक्षातील सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांशी आधी चर्चा करतो. मग त्यांना सोबत घेऊन मनपा मुख्यालयात जातो. पण दानवे यांनी तनवाणींशी चर्चा केलीच नाही. महापालिकेत १० वाजता बैठकीला या, असा निरोप दहा मिनिटे आधी पीएमार्फत दिला. ही आपल्या कार्यक्षेत्रात घुसखोरी असल्याचे वाटून तनवाणी संतापले. त्यांनी बैठकीकडे पाठ फिरवली. दरम्यान, दानवे यांनी माजी महापौर नंदकुमार घोडेले, शहरप्रमुख संतोष जेजूरकर, पूर्व विधानसभा संघटक राजू वैद्य आदींना सोबत घेऊन मनपाचा आढावा घेतला. पाणीपुरवठा योजनेला निधी कमी पडू देऊ नका, अशी सूचना केली. औरंगाबाद जिल्ह्यातून सर्वात कमी शपथपत्रे दिल्याच्या मुद्द्यावरून दानवे यांची कोंडी करण्याचा प्रयत्न खैरे-तनवाणी गटाकडून झाला. त्याची परतफेड म्हणून दानवेंनी बैठकीचा घाट घालून त्यात तनवाणींना वगळले, अशी चर्चा उद्धवसेनेत आहे.

तनवाणींच्या अखत्यारीत कामाची सूचना करणार : चंद्रकांत खैरे यासंदर्भात तनवाणी यांना विचारणा केली असता ते म्हणाले, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते म्हणून दानवे यांनी आढावा घेतला. यापेक्षा जास्त काही बोलण्यासारखे माझ्याकडे नाही. मात्र, खैरे म्हणाले की, विरोधी पक्षनेते म्हणून मनपात जाण्याचा दानवेंना पूर्ण अधिकार आहे. पण तनवाणींना दहा मिनिटे आधी बैठकीचे निमंत्रण देऊन दानवेंनी अपमान केला. असे ते वारंवार करत आहेत. मी लवकरच शहरातील पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावून त्यांना तनवाणींच्या अखत्यारीत काम करण्याची सूचना करणार आहे. दरम्यान, दानवे यांच्याशी संपर्क साधला असता ते बैठकीमध्ये व्यस्त असल्याचे सांगण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...