आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पदवीधर, शिक्षक निवडणूक:तिकीट हुकलेल्या नाराजांच्या कुरबुरी, पाच जागांसाठी भाऊगर्दी, पुणे पदवीधरसाठी 108 अर्ज

औरंगाबाद9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या पाच जागांसाठी गुरुवारी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी महाविकास आघाडी आणि भाजपमधील तिकीट नाकारलेल्या इच्छुकांच्या कुरबुरी उफाळून आल्या. औरंगाबाद, नागपूर आणि पुणे पदवीधर मतदारसंघ आणि पुणे, अमरावती शिक्षक मतदारसंघ अशा पाच जागांसाठी ही निवडणूक होत आहे. गुरुवारी आघाडी आणि भाजपच्या जवळपास सर्वच उमेदवारांनी शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केले. उमेदवारी दाखल करण्यासाठी विभागीय आयुक्तालयांमध्ये राजकीय पक्षांचे पदाधिकारी, नेते, कार्यकर्त्यांची गर्दी उसळली होती. औरंगाबाद आणि नागपूर पदवीधर मतदारसंघात भाजपच्या नाराजांची सुप्त लाट आहे. बीड जिल्ह्यातील पंकजा मुंडे समर्थक रमेश पोकळे यांनी यापूर्वीच उमेदवारी दाखल केली आहे. दरम्यान, उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख दिवाळीनंतर म्हणजे १७ नोव्हेंबर रोजी असून त्यानंतरच सर्व मतदारसंघांतील चित्र स्पष्ट होणार आहे.

नाथाभाऊंनंतर अनेक जण राष्ट्रवादीच्या वाटेवर
भाजपच्या खोट्या आश्वासनांना नाथाभाऊ कंटाळले होते. सरकार येणार येणार म्हणून अनेकांना भाजप गाजर देत आहे. पण सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल. तोपर्यंत अनेक जण भाजप सोडून आमच्या पक्षात येतील, असा टोला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लगावला.

निवडणूक होईपर्यंत पंक्चर होऊ नका : खासदार रावसाहेब दानवे
मराठवाडा पदवीधर निवडणूक सोपी नाही. त्यामुळे ही निवडणूक होईपर्यंत कोणत्याही परिस्थितीत पंक्चर होऊ नका. आपल्या सायकलचा वॉल थुंका लावून नीटपणे तपासून घ्या. मगच चाकामध्ये हवा भरा, असा खास ग्रामीण शैलीतील सल्ला केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी गुरुवारी भाजपच्या कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना दिला.

महाविकास आघाडी-भाजप थेट लढत
औरंगाबाद विभागात आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार सतीश चव्हाण तर भाजपकडून शिरीष बोराळकर यांनी उमेदवारी दाखल केली. पुणे पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादीकडून सांगलीचे अरुण लाड हे रिंगणात उतरले आहेत. त्यांना भाजपच्या संग्राम देशमुख यांचे आव्हान असून देशमुख यांनी बुधवारी उमेदवारी अर्ज भरला होता. नागपूर पदवीधर मतदारसंघात भाजपकडून विद्यमान महापौर संदीप जोशी तर काँग्रेसचे अभिजित वंजारी यांची लढत असेल. पुणे शिक्षक मतदारसंघात काँग्रेसचे जयंत आसगावकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. या ठिकाणी भाजपकडून जितेंद्र पवार रिंगणात आहेत. अमरावती शिक्षक मतदारसंघात आघाडीकडून शिवसेनेचे प्रा. श्रीकांत देशपांडे तर भाजपकडून डॉ.नितीन धांडे रिंगणात आहेत.

पाच जागांसाठी २९९ अर्ज
पदवीधर मतदारसंघ
औरंगाबाद ६५
पुणे १०८
नागपूर ३१
शिक्षक मतदारसंघ
पुणे ६७
अमरावती २८

बातम्या आणखी आहेत...