आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षक संघाच्या निवडणुकीसाठी इच्छुकांची मांदीयाळी:संभाजी ब्रिगेडची औरंगाबाद, अमरावतीत लढण्याची तयारी

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शिक्षक मतदार संघाची निवडणूक प्रक्रिया जाहीर झाली आहे. अमरावती व औरंगाबाद मतदार संघातून संभाजी ब्रिगेड निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे. मात्र, शिवसेनेसोबत युती झाली असून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करून उमेदवार जाहीर केले जाणार आहे. एकुण सहाजण इच्छुक आहेत.

दुसरीकडे राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाला प्रदीप सोळुंके यांनी तिकीट मागितले आहे. तर औरंगाबादेतून उमेदवारी मिळाल्यास निवडणूक लढवण्यास प्रदेश प्रवक्ता डॉ. शिवानंद भानुसे हेही इच्छुक आहेत.

संभाजी ब्रिगेडने आगामी सर्व निवडणुका लढवण्याचे या पूर्वी जाहीर केले आहे. त्या दष्टीने अध्यक्ष अॅड. मनोज आखरे आणि महासचिव सौरद खेडेकर यांनी केंद्रिय बैठकीत औरंगाबाद शिक्षक मतदार संघ आणि अमरावती पदवीधर मतदार संघात उमेदवार देऊन निवडणूक लढवण्याचे निश्चित केले आहे. यासाठी ६० हजारांवर शिक्षक मतदार नोंदणी केली असून निवडणुकीची तयारी केलेली आहे.

शिवसेनेसोबत युती झाल्यामुळे दोन्ही मतदारसंघाचा संदर्भात वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरु असून दोन दिवसांत निर्णय होईल, अशी माहिती डॉ. भानुसे यांनी दिली. तुम्ही स्वत: औरंगाबादेतून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहात का? असा प्रश्न विचारला असता, पक्षश्रेष्ठींनी आदेश दिला तर निवडणूक लढेल व जिंकेलही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी जिल्हाध्यक्ष धनंजय पाटील, जिजाऊ ब्रिगेडच्या अ‌ॅड. वैशाली कडू, रवींद्र वाहटुळे, रेखा वाहटुळे आदी उपस्थित होते.

प्राथमिक शिक्षकांचे प्रश्न कुणी सोडवायचे?

शिक्षक मतदार संघात अनुदानीत विद्यालय आणि महाविद्यालयातील शिक्षक मतदारांनाच मतदानाचा व निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे. त्यामुळे हजारो प्राथमिक शिक्षक या मतदान प्रक्रियेतून वंचित राहात आले आहेत. आताही आचारसंहिता लागू झाल्याने या निवडणुकीस त्यांना मुकावे लागेल. तसेच त्यांचे प्रश्नांला वाचा फोडणारा कुणी वालीच नाही. याबाबत संभाजी ब्रिगेड लढा उभारून शिक्षक मतदार संघात प्राथमिक शिक्षकांनाही सामावून घेतले जावे यासाठी प्रयत्न करेल. यामुळे एक वेगळे राजकीय चित्र, स्पर्धा निर्माण होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

मराठवाडा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या ताब्यात

मराठवाडा शिक्षक मतदार संघ राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे. विक्रम काळे व त्यांचे वडील वसंतराव काळे यांनी शिक्षक संघटनेचा विजय रोखला. या निवडणुकीतही विक्रम काळे यांचे तिकिट जवळपास निश्चित झाले आहे. मात्र, वक्ता सेलेचे प्रदेशाध्यक्ष, व्याख्याते प्रदिप सोळुंके यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे उमेदवारीची मागणी केली आहे. त्यामुळे तिकिट कुणाला मिळते हे लवकरच स्पष्ट होईल.

तिकीट मिळण्याची आशा - सोळुंके

दिव्य मराठीशी बोलताना सोळुंके म्हणाले, शिक्षक मतदार संघातून निवडणूक लढवण्याचा विचार केला होता. पण आमदार विक्रम काळे यांचे वडिल वसंतराव काळे माझ्याकडे आले व त्यांनी निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली होती. तिकिट नाहीच मिळाले तर वेळेवर अपक्ष लढायचे का, याबाबतही चाचपणी करू असेही सोळुंके म्हणाले. आमदारकी न मिळाल्यामुळे नाराज होऊन त्यांनी दोन महिन्यापूर्वी राजीनामा पाठवला होता तो पक्षाने स्वीकारला नाही. आता तिकिट नाही मिळाले तर पक्षातून बाहेर पडण्यासाठी कारण मिळेल.

बातम्या आणखी आहेत...