आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षक आमदारांचा प्रशांत बंब यांच्यावर हल्लाबोल:तुमच्या मतदारसंघात आधी नीट डांबर टाकलं कि नाही ते पाहा!

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भाजप आमदार प्रशांत बंब यांच्याविरोधात आज औरंगाबादेत शिक्षकांनी भव्य मोर्चा काढला. या आंदोलनात पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण, आ. विक्रम काळे व शिक्षक भारतीचे कपिल पाटीलदेखील सहभागी झाले आहेत. आमदार प्रशांत बंब यांनी जिल्हा परिषदेच्या शिक्षकांबाबत केलेल्या वक्तव्यावरून या तिन्ही आमदारांनी आ. प्रशांत बंब यांच्यावर जोरदार टीका केली.

तुमचा मतदारसंघ पाहा

आ. विक्रम काळे म्हणाले की, अनेक मोठे नेते सरकारी शाळेत शिकले. वसंतदादा पाटील, यशवंतराव चव्हाण सुद्धा सरकारी शाळेत शिकले. मग आजच का तुम्हाला वाईट वाटत आहे? शिक्षक कुठे राहतो यापेक्षा तो शाळेत कसा शिकवतो, वेळेवर येतो कि नाही, हे आधी पाहा. त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी आम्ही आहोत. तुमच्या मतदारसंघात जो रस्ता तयार होत आहे तिथे डांबर निट टाकलं कि नाही ते पाहा. तुमच्या मतदारसंघात 2 तालुके आहेत. लोकांना राशन मिळत नाहीये. रॉकेल मिळतंय कि नाही ते पाहा. या अनेक गोष्टी तुम्हाला करण्यासारख्या आहेत. त्याकडे तुम्ही लक्ष द्या. गुणवत्ता असल्यामुळेच आज इंग्रजी माध्यमातून विद्यार्थी जिल्हा परिषदेत येत आहेत. पालकांमध्ये तेढ, संशयाचे वातावरण निर्माण करु नका.

यापाठीमागे मोठे षडयंत्र

पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतिश चव्हाण म्हणाले, ज्या शिक्षकांवर आरोप केले आहेत त्यांचे आई-वडिलही जिल्हा परिषद शाळेत शिकले आहेत. यापाठीमागे मोठे षडयंत्र आहे. खोक्यांचा बाजार याठिकाणी चालणार नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिले त्यानुसार देशाचा कारभार सुरु आहे.

हा संविधानावरचा हल्ला

सतिश चव्हाण म्हणाले, ज्यांना हे मान्य नाही ते हे संपवत आहेत. एका शाळेत 10 जागा असताना 4 शिक्षक कारभार चालवत आहेत. त्यामुळे गुणवत्तेचा याच्याशी काही संबंध नसल्याचे त्यांनी म्हटले.

आमदार कपिल पाटील म्हणाले, शिक्षकांना जे टार्गेट केले जात आहे. तो संविधानावरचा हल्ला आहे. देशभरात खासगीकरणाचे वारे वाहत आहेत. गोरगरिबांसाठी असलेली शिक्षणपद्धती मोडित काढण्याचा प्रयत्न सुरु आहे.

औरंगाबादेत आमखास मैदान ते विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत शिक्षक सन्मान रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यभरातील हजारो शिक्षक या आंदोलनात सहभागी झाले आहेत. प्रशांत बंब यांच्या निषेधाच्या टोप्याही शिक्षकांनी घातल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...