आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमदार बंब यांच्याविरोधात मोट:आमदारांसह शिक्षक रविवारी विभागीय आयुक्तालयावर काढणार मोर्चा

औरंगाबाद20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गंगापूर - खुलताबादचे भाजप आमदार प्रशांत बंब आणि शिक्षकांमधील संघर्ष दिवसेंदिवस वाढत चालला आहे. मुख्यालयी रहात नाहीत या शिक्षकांवरील आरोपानंतर बंब यांच्याविरोधात शिक्षकांसह पदवीधर, शिक्षक आमदार आक्रमक झालेत. ते रविवारी (दि. ११) सकाळी 11 वाजता औरंगाबादमधील आमखास मैदान ते विभागीय आयुक्त कार्यालायपर्यंत भव्य मोर्चा काढणार आहेत.

मुख्यालयी न राहता बहुतांश शिक्षक खोटी कागदपत्रे सादर करून घरभाडे घेतात. शासनाची फसवणूक करतात, असा आरोप गंगापूर-खुलताबादचे भाजप आमदार प्रशांत बंब यांनी पावसाळी अधिवेशनात केला होता. तेंव्हापासून बंब विरुद्ध शिक्षक असा संघर्ष सुरू आहे. तीन आठवडे झाले, तरी हा वाद मिटलेला नाही. आमदार बंब यांनी शिक्षकांची माफी मागावी, अशी शिक्षकांची मागणी आहे. मात्र, बंब आपल्या भूमिकेवर ठाम आहेत.

पाच सप्टेंबरला शिक्षक दिनाच्या दिवशी आमदार बंब यांनी गांधीगिरी करत मुख्यालयी राहणाऱ्या शिक्षकांचा सत्कार व पूजन करत पुन्हा प्रत्यक्ष भेट देऊन शिक्षकांचे वास्तव समोर आणले. पिढी बरबाद करणाऱ्या शिक्षकांना शिक्षक व पदवीधर आमदार पाठीशी घालतात असा आरोप करत त्यांचे मतदारसंघच रद्द करा, अशी मागणी करत या आमदारांचा रोष ओढवून घेतला आहे. त्यामुळे शिक्षकांसह व पदवीधर व शिक्षक आमदार आक्रमक झाले आहेत.

आमदार बंब यांच्या विरोधात त्यांनी येत्या ११ सप्टेंबर रोजी औरंगाबादेत भव्य मोर्चा काढण्याचे नियोजन केले आहे. शहरातील आमखास मैदान ते विभागीय आयुक्त कार्यालायपर्यंत शिक्षकांचा हा भव्य मोर्चा निघणार आहे. शिक्षकांचे आणि मोर्चाचे नेतृत्व शिक्षक आमदार विक्रम काळे, कपिल पाटील, पदवीधरचे आमदार सतीश चव्हाण हे करणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...