आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्रात तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समिती (बीआरएस) पक्षामध्ये प्रवेशाचे सोहळे घेतले जात आहेत. शरद जोशी यांच्या शेतकरी संघटनेमधील पदाधिकाऱ्यांना ‘बीआरएस’ने मोहिनी घातल्याचे चित्र आहे. शेतकरी संघटनेचे अनेक पदाधिकारी या पक्षात गेले आहेत. त्याचबरोबर किमान दोन ते तीन पक्ष फिरून आलेले पुढारी देखील या पक्षात प्रवेश करत आहेत. आर्थिकदृष्ट्या मजबूत असलेल्या पक्षाची तेलंगणात ‘एमआयएम’सोबत युती आहे. त्यामुळे महाराष्ट्रात ‘एमआयएम’ला वंचित बहुजन विकास आघाडीनंतर ‘बीआरएस’चा पर्याय उपलब्ध झाला आहे.
मराठवाडा, विदर्भातील शेतकऱ्यांमध्ये कापूस, सोयाबीन, सरकारच्या शेतमालासंबंधित धोरणाबाबत मोठ्या प्रमाणात रोष आहे. याच काळात ‘बीआरएस’चे महाराष्ट्रात ताकदीने उतरणे भाजपच्या पथ्यावर पडणारे असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आाहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये वंचित बहुजन विकास आघाडी आता ‘एमआयएम’सोबत नसल्यामुळे खासदार इम्तियाज जलील यांना फटका बसू शकतो. त्यामुळे त्याची भरपाई वंचितऐवजी ‘बीआरएस’च्या माध्यमातून केली जाऊ शकते.
विदर्भातील मोठे नेते हरिभाऊ राठोड २००४ मध्ये भाजपकडून खासदार निवडून आले होते. २०१३ मध्ये काँग्रेस, त्यानंतर त्यांनी ‘आप’मध्ये प्रवेश केला. आता ‘आप’मधून ते ‘बीआरएस’मध्ये आले आहेत, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष राहिलेल्या कदीर मौलाना यांनी औरंगाबाद मध्य मतदारसंघात २०१९ मध्ये विधानसभेची निवडणूक लढवली होती. ते ७,९२० मते घेत चौथ्या क्रमांकावर राहिले होते. भाजपच्या पथ्यावर पडणार राज्यात सध्या ग्रामीण भागात शेतकऱ्यांत मोठ्या प्रमाणात रोष आहे. त्यामुळे त्याचा महाविकास आघाडीकडे लाभ होऊ शकतो. मात्र ‘बीआरएस’च्या माध्यमातून ही मते इतरत्र आघाडीपासून दूर जाऊ शकतात. हे मतविभाजन भाजपच्या पथ्यावर पडू शकते, असे मानले जाते.
चिकटगावकर यांचा दोन पक्षांचा प्रवास
अभय चिकटगावकर यांनी वैजापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवत २०१९ मध्ये ३९,०२० मते (सुमारे २० टक्के) घेतली होती. त्यांचा शिवसेनेच्या रमेश बोरनारे यांनी ५९,१६३ मतांनी पराभव केला होता. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. आता त्यांनी भाजपमधून ‘बीआरएस’मध्ये प्रवेश केला आहे.
जाधव तीन पक्षांनंतर
‘बीआरएस’मध्ये छत्रपती संभाजीनगरमधून ‘बीआरएस’मध्ये गेलेले हर्षवर्धन जाधव हे मनसे, शिवसेना या पक्षांत होते. त्यांनी स्वत:चा राजकीय पक्ष काढला होता. . मनसेमध्ये असताना त्यांना कन्नड विधानसभेत २००९ मध्ये ४६,१०६ मते मिळाली होती. त्यांनी उदयसिंह राजपूत यांचा पराभव केला. २०१४ मध्ये शिवसेनेकडून लढलेल्या जाधव यांना ६२,५४६ मते मिळाली होती. त्यावेळीही त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजपूत यांचा पराभव केला. २०१९ मध्ये स्वत:चा राजकीय पक्ष काढून उभे राहिलेल्या जाधव यांनी ६०,५३५ मते घेतली. मात्र, त्यांचा पराभव झाला होता.
अद्याप निर्णय नाही
तेलंगणामध्ये ‘बीआरएस’ आणि ‘एमआयएम’ यांची आघाडी आहे. मात्र, महाराष्ट्राबाबत अद्याप कुठलाही निर्णय झालेला नाही. याबाबतचा निर्णय पक्षाचे नेते ओवेसी यांच्या स्तरावर घेतला जाईल. - इम्तियाज जलील, खासदार, एमआयएम
महाविकास आघाडीला फटका बसेल
ग्रामीण भागात शेतमालामुळे शिंदे-फडणवीस यांच्याविषयी रोष आहे. हा रोष ‘बीआरएस’कडे गेला तर त्याचा फटका मविआला बसेल. त्याचा फायदा भाजपला होईल. - निशिकांत भालेराव, राजकीय अभ्यासक
महाराष्ट्रामध्ये कोणाशीही युती नाही
‘एमआयएम’सोबत आमची युती नाही. महाराष्ट्रात असा निर्णय झालेला नाही. आमच्यासोबत इतर पक्षातून नेत्यांसह काही चांगले कार्यकर्ते येत आहेत. - माणिक कदम, अध्यक्ष, बीआरएस महाराष्ट्र किसान आघाडी
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.