आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धार्मिक तेढ:शिबिराचे नाव ‘हेल्दी पीपल, हेल्दी नेशन’, संदेश मात्र धार्मिक तेढ-देशविराेधी कटाचा

औरंगाबाद11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पीपल फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांकडून देशविघातक कृत रचत असल्याची माहिती एटीएसला मिळाली हाेती. तेव्हापासून आैरंगाबादेतील चार संशयितांवर नजर ठेवण्यात आली हाेती. पीएफआय संघटनेने २३ नाेव्हेंबर २०२१ राेजी चिकलठाणा येथे ‘हेल्दी पीपल, हेल्दी नेशन’ अशा नावाखाली शिबिर घेतले. त्यात देशविघातक व जातीय तेढ निर्माण होईल अशी भाषणे केली. त्यानंतर वर्षभर हे दहशतवादी कार्यकर्ते जिन्सी व इतर परिसरात शिबिरांचे गाेपनीयरित्या आयोजन करून देशविघातक भाषणे करत होते. यातून दाेन धर्मात तेढ निर्माण करण्यासाठी तरुणांची माथीही भडकावली जात हाेती. हे चारही संशयित परराज्य, परदेशातील काही संशयितांशी संपर्कात असल्याचे धागेदोरे मिळाले आहेत, असा दावा एटीएसच्या वतीने न्यायालयासमाेर करण्यात आला.

दोन्ही ठिकाणी एमआयएमचे पदाधिकारी : संध्याकाळी सहा वाजता न्यायालयात युक्तिवाद ऐकण्यासाठी ज्युनियर वकिलांनी न्यायालयात गर्दी केली होती. युक्तिवाद सुरू असताना न्यायाधीशांनी तपास अधिकाऱ्यांकडून केस डायरी मागवून दहा मिनिटे वाचली. त्यानंतर आराेपींना काेठडी सुनावली. पहाटे आरोपींना ताब्यात घेण्यात येत असताना किराडपुरा, महेमुदपुरा, जुना बायजीपुरा येथे तसेच न्यायालयातही मुस्लिम संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमा झाले हाेेते.

आराेपींच्या वकिलाचा सवाल : उशिरा गुन्हा दाखल का?
चार कार्यकर्त्यांच्या वकिलांनी युक्तिवाद केला की, पीएफआयवर बंदी नाही तरीही देशविघातक कृत्यात सहभागाचे १३ (११) बी कलम का लावण्यात आले ?
दहा महिन्यांपासून या चौघांवर पाळत ठेवली जात असेल तर एवढ्या उशिरा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याचे कारण काय? त्यांची घरझडती झाली असून फक्त बँकेची खाते तपासण्यासाठी पोलिस कोठडीची आवश्यकता नाही. हा युक्तिवाद विशेष न्यायालयाऐवजी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर झाला पाहिजे.
त्यावर कोर्टाने सांगितले की, चौघांवरील आरोप आणि कलमे अतिशय गंभीर आहेत. त्यामुळे तुमच्या मुद्द्यांवर नंतर चर्चा होऊ शकते.
एटीएसकडून सहायक पोलिस आयुक्त सुनील तांबे यांच्यासह विशेष सरकारी वकील विनोद कोटेचा यांनी बाजू मांडली. चारही कार्यकर्त्यांतर्फे अॅड. अदिल बियाबानी, खिजर पटेल, मोसीन खान, समीर दारुवाला यांनी बाजू मांडली.

एटीएसने पहाटे घरात घुसून मुलांना अटक केली. आमच्या मुलांनी नेमका काय गुन्हा केला हे आम्हाला सांगा, असे संशयित परवेज खानचे वडील मुज्जमील खान यांनी एटीएसच्या अधिकाऱ्यांना विचारले. तेव्हा वरून ऑर्डर आली एवढेच सांगितल्याचे वडील म्हणाले.

आमची मुले संघटनेच्या माध्यमातून समाजिक समस्या सोडवण्यासाठी धरणे, आंदोलने करतात. ही आंदोलने केंद्र सरकारच्या विरोधात असतात. त्यामुळेच ही कारवाई करण्यात आली. आतापर्यंत या तरुणांनी कोविडकाळात समाजातील प्रत्येक धर्मातील लाेकांना मदत केली. परवेज पीयूपीचे काम करतो. तो कशाला देशविघातक कार्यात सामील होईलॽ त्याचे लग्न झाले आहे. तो स्वतंत्र राहतो. त्याला चार मुले आहेत. आम्ही २० वर्षांपूर्वी पोट भरण्यासाठी उत्तर प्रदेशातून या शहरात आलो. दहावी शिकल्यानंतर तो देखील कामाला लागला. कधी कुठला गुन्हा नाही. अचानक पोलिस आले, त्यांनी आमच्या मुलांना अटक केली. २०१९ मध्येसुद्धा अशाच कारवाया करण्यात आल्या होत्या. २०२४ मध्ये पुन्हा लोकसभेच्या निवडणुका आहेत. राजकारणासाठी आमच्या मुलांचा बळी जात असल्याचे ते म्हणाले.

शहरातील बंदोबस्त वाढला
या कारवाईच्या दरम्यान पहाटे गर्दी जमली होती. त्यानंतर दुपारी दोनच्या सुमारास रोशन गेट परिसरात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय)कडून आंदोलन करण्याचीदेखील तयारी सुरू होती. या पार्श्वभूमीवर शहरात पोलिसांनी बंदोबस्त वाढवला होता.

बातम्या आणखी आहेत...