आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मान्सूनची पेरणी सुरू:अकोला आणि मालेगाव कोरोनासह तापमानाचेही हॉटस्पॉट, राज्यावर पूर्वमोसमी पावसाचे सावट

औरंगाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • पुणे वेधशाळेनुसार १० ते १३ मे या काळात राज्यात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता

(अजय कुलकर्णी)

मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज्यातील पारा चांगलाच चढला आहे. एकीकडे कोरोनाचे हॉटस्पॉट बनलेले मालेगाव आणि अकोला आता तापमानाचेही हॉटस्पॉट बनले आहेत. एक मेपासून अकोला आणि मालेगावचा पारा सातत्याने ४४ अंशांवर आहे. शनिवारी अकोला येथे राज्यातील सर्वाधिक ४४.३ अंश तापमान नोंदवण्यात आले. दरम्यान, अंदमानजवळ बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. मान्सूनसाठी हे हवामान अनुकूल बनत असल्याचे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे. राज्यात १० ते १३ मे या काळात पूर्वमोसमी पावसाची शक्यता पुणे वेधशाळेने वर्त‌‌वली आहे.

भारतीय हवामान विभागाच्या (आयएमडी) अहवालानुसार, दक्षिण अंदमान समुद्र आणि नजीकच्या सुमात्रा किनाऱ्याजवळ चक्रवात स्थिती निर्माण झाली आहे. परिणामी दक्षिण बंगालचा उपसागर आणि अंदमान समुद्रात १३ मेपर्यंत कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होईल. तर मध्य प्रदेशपासून विदर्भ, मराठवाडा, दक्षिण मध्य महाराष्ट्र ते दक्षिण तामिळनाडूपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. यामुळे राज्यात या आठवड्यात पूर्वमोसमी पावसाची शक्यता आहे.

    अकोला, मालेगाव तापलेलेच : राज्यात एक मेपासून बहुतेक जिल्ह्यांतील पारा चाळिशीपार आहे. शनिवारी विदर्भातील सर्वच जिल्ह्यांत पारा ४० अंशांवर नोंदण्यात आला. मालेगाव येथे ४३.२ अंश तापमानाची नोंद झाली. या आठवड्यात पारा उतरण्याची शक्यता आहे.

राज्यातील प्रमुख शहरांचे तापमान : अकोला ४४.३, मालेगाव ४३.२, सोलापूर ४१.७, औरंगाबाद ४१.७, जळगाव ४३.५, नगर ४०.५, बीड ४२, परभणी ४३, नागपूर ४३, चंद्रपूर ४३.५ अंश सेल्सियस.

राज्यात पावसाची शक्यता

पुणे वेधशाळेनुसार १० ते १३ मे या काळात राज्यात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता.

१० मे : मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात काही ठिकाणी मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.

११ मे : मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात काही ठिकाणी सोसाट्याचा वारा, मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता

१२ व १३ मे : मध्य महाराष्ट्र, विदर्भ तसेच मराठवाड्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.

मान्सूनसाठी अनुकूल हवामान

अंदमान समुद्रातील हालचाली मान्सूनसाठी अनुकूल आहेत. अंदमानात २० मेच्या आसपास नैऋत्य मोसमी पाऊस दाखल होण्याची शक्यता आहे. राज्यातही या आठवड्यात पावसाची शक्यता आहे. औरंगाबाद, नगर, नाशिक, अकोला, अमरावती, नांदेड, नंदुरबार, धुळे, चंद्रपूर, पुणे आदी जिल्ह्यांत १० ते १३ मे या काळात ३ ते १५ मिमी पावसाची शक्यता आहे. - डॉ. रामचंद्र साबळे, हवामान तज्ञ

बातम्या आणखी आहेत...