आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराजस्थानमार्गे औरंगाबादसह मराठवाड्यात तीव्र उष्ण वारे वाहून येत आहे. परिणामी गत आठ दिवसांपासून तापमान सतत वाढत आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा १७ दिवस आधीच शुक्रवारी (१८ मार्च) तापमानाने ४० डिग्री सेल्सियचा टप्पा गाठला. तर शनिवारी ३९.२ अंशांवर होते. सहा दिवसांपासून सरासरीपेक्षा ३ ते ४ अंशांनी तापमान जास्त राहिले. उष्णतेच्या तीव्र झळांनी अंगाची लाहीलाही होत आहे. दुपारच्या वेळी रस्त्यांवर शुकशुकाट जाणवत आहे.
११ मार्चपासून पावसाची स्थिती निवळली व राजस्थानकडून अतिउष्ण वारे वाहण्यास सुरुवात झाली. त्यामुळे गारपिटीने १ ते ४ अंशांपर्यंत घट झालेल्या सरासरी तापमानात गत आठ दिवसांत वेगाने वाढ झाली. १८ मार्च रोजी यंदाच्या मोसमात पारा ४० अंशांवर गेल्याची नोंद झाली. गतवर्षी ५ एप्रिल रोजी तापमान ४१ अंशांवर गेले होते. सतरा दिवस आधीच तापमानाने चाळिशी गाठली आहे.
पावसाची शक्यता : आग्नेय बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. २१ मार्चला त्याचे चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. तर हंगामातील पहिल्या चक्रीवादळाला श्रीलंकेच्या सूचनेनुसार “असानी’ असे नाव देण्यात आले आहे. अंदमान निकोबार बेटांच्या जवळून चक्रीवादळ जाणार असल्याने येथे वादळी वारे, अवकाळी पावसाचा जोरदार फटका बसू शकतो. २२ मार्चला हे चक्रीवादळ म्यानमार, बांगलादेशाच्या किनारपट्टीजवळ पोहोचेल. त्याचे महाराष्ट्रातील वातावरणावरही परिणाम होणार आहेत. हवेचा वेग वाढेल. ढगांची गर्दी व तुरळक ठिकाणी पाऊस पडेल, तापमान व आर्द्रतेत चढ-उतार होतील.
रात्रीच्या तापमानात ५ अंशांनी वाढ
कमाल तापमान म्हणजे दिवसाच्या तापमानात सरासरीच्या तुलनेत ३ अंशांनी तर किमान तापमान (रात्रीच्या तापमानात) ५ अंशांनी वाढून ते शनिवारी प्रथमच २४ अंश सेल्सियसवर गेल्याची नोंद चिकलठाणा वेधशाळेने घेतली आहे. दिवसभर सूर्य तळपतो. वातावरणात उष्णता अडकून राहते. सिमेंटची घरे रात्री अधिक तापत असून लोक घामाघूम होत आहेत. कूलर व फॅनही गरम हवा मारत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.