आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
कॉल केला की, ‘कोरोना की बीमारी से लडना है, बीमार से नहीं...’ असा संदेश ऐकण्यास मिळतो. पण तो लोकांच्या हृदयात पोहोचलेला दिसत नाही. जालना जिल्ह्यातील कोरोनाबाधित नसलेल्या तरुणाचा औरंगाबादेत मृत्यू झाला. मात्र, गावकऱ्यांनी त्याच्यावर अंत्यसंस्कारास विरोध करत मृतदेह गावात आणूच नका, असे बजावले. घाटीनेही देहदान करून घेण्यास नकार दिला. ‘काय विल्हेवाट लावायची ती तुम्हीच लावा,’ असे सांगितले. १० तासांच्या फरपटीनंतर औरंगाबादमधील पुष्पनगरीत दोन भावांनी त्याला अग्निदाह दिला.
या हृदयद्रावक प्रकाराबाबत त्या ३५ वर्षीय तरुणाच्या नातेवाइकांनी सांगितले की, तो वाळूज येथील एका कंपनीत काम करत होता. शुक्रवारी सर्दी, खोकला व श्वसनाचा त्रास सुरू झाल्याने तो घाटी रुग्णालयात दाखल झाला. तत्पूर्वी त्याने जालन्यातील भावाला माहिती दिली होती. त्यामुळे तो औरंगाबादेत आला. तपासणीत त्याला कोरोना नाही, न्यूमोनिया झाला असल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, तरुणाचा चुलतभाऊही आला. दोघांनी मिळून त्याला खासगी रुग्णालयात हलवण्याचे ठरवले. त्यासाठी मोठा भाऊ जालना येथे पैशांची जुळवाजुळव करत होता. तोच सोमवारी सकाळी ११ वाजता भावाचा मृत्यू झाल्याची माहिती घाटीतून देण्यात आली. तो तातडीने औरंगाबादला आला. दरम्यान, या संदर्भात घाटीच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुरेश हरबडे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण ते उपलब्ध होऊ शकले नाहीत.
अंत्यसंस्कारासाठी पोलिसांनी दिले प्रमाणपत्र
अखेरचा पर्याय म्हणून सायंकाळी त्या तरुणाच्या दोन्ही भावांनी क्रांती चौक पोलिस ठाणे गाठले. सहायक फौजदार शांतीलाल राठोड, सहायक पोलिस निरीक्षक नजीर तडवी यांना सर्व हकीगत सांगितली. राठोड यांनी अंत्यसंस्काराच्या परवानगीसाठी पोलिसांचे प्रमाणपत्र मनपाला दिले. त्यानंतर पुष्पनगरी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
कोरोना नव्हे न्यूमोनियाने मृत्यू, तरीही लोक एेकेनात
तरुणाच्या मृत्यूची माहिती मिळताच गावकऱ्यांपैकी कोणीही मदतीस तयार होईना. मृतदेह इकडे आणून गावात अंत्यसंस्कार करू नका, असेही सांगण्यात आले. कोरोना नव्हे न्यूमोनियाने मृत्यू झाला, असे वारंवार सांगूनही गावकरी ऐकण्यास तयार नव्हते. त्यामुळे हतबल झालेल्या भावाने घाटी प्रशासनाला देहदान करून घेण्याची विनंती केली. मात्र, ती मान्य करण्यात आली नाही. उलट तुमच्यास्तरावर तुम्ही अंत्यसंस्कार करा अथवा पोलिस कारवाईला सामोरे जा, असे उत्तर मिळाले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.