आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संतपीठासाठी निधी देऊन स्वायत्त संस्थेच्या दर्जासाठी प्रयत्न करणार:उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांची ग्वाही

पैठण4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पैठण येथे संतपीठाची नवीन इमारत उभारण्यासाठी सरकारतर्फे निधी दिला जाईल. त्यासाठी आपण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची भेट घेऊन पाठपुरावा करु. तसेच संतपीठाला स्वायत्त संस्थेचा दर्जा देण्यासाठीही आपण प्रयत्न करणार असल्याची ग्वाही उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी दिली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संचालित या संतपीठाचा पहिला प्रमाणपत्र वितरण सोहळा शुक्रवारी पार पडला, या वेळी पाटील बोलत होते. कुलगुरू डॉ. प्रमोद येवले अध्यक्षस्थानी होते. व्यासपीठावर पालकमंत्री संदिपान भुमरे, उच्च व तंत्रशिक्षण खात्याचे सचिव विकासचंद्र रस्तोगी, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, प्र. कुलगुरू डॉ. श्याम शिरसाठ, कुलसचिव डॉ. भगवान साखळे, संतपीठाचे समन्वयक डॉ. प्रवीण वक्ते आदींची प्रामुख्याने उपस्थिती हाेती. मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, बाराव्या शतकानंतर भारत देशावर परकीय आक्रमणामुळे समाज विखुरला गेला होता. या परिस्थितीत संतांच्या शिकवणीतून भारताला स्थिरत्व, आत्मविश्वास आणि संस्कारी जीवन पद्धती मिळाली. यातून मानवतेचा वैश्विक संदेश दिला गेला. तो वारसा संतपीठ पुढे नेईल. जागतिक दर्जाचे शिक्षण लवकरच उपलब्ध करून देऊ’. दरम्यान, संतपीठातील पहिल्याच प्रमाणपत्र वितरण सोहळ्यात नियोजनाचा अभाव दिसून आला. येथे विद्यार्थ्यांपेक्षा भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांचीच जास्त उपस्थिती दिसून आली.

पीजी डिप्लोमा, संगीत विभाग सुरू करणार : कुलगुरू संतपीठाला स्वायत्त संस्था करण्याची मागणी केलेली आहे. सध्या येथे ५ अभ्यासक्रम सुरू आहेत. यापुढे पीजी डिप्लोमा सुरू करण्यात येणार आहे. शिवाय येथे संत साहित्य, तत्त्वज्ञान, संगीत विभाग सुरू करण्यात येणार असल्याचे कुलगुरू डाॅ. प्रमाेद येवले यांनी सांगितले.

वसतिगृहांसाठी िवकास निधी मिळवून देणार : पालकमंत्री विद्यार्थी पैठणच्या संतपीठातून शिक्षण घेऊन बाहेर पडत आहेत ही अभिमानाची बाब आहे. या शिक्षणाचा आणखी प्रसार झाला पाहिजे. इथे आणखी सोयी-सुविधा देण्यासाठी चंद्रकांतदादांनी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी पालकमंत्री भुमरे यांनी केली. तसेच या भागातील वसतिगृहांची दुरुस्ती व बांधकामासाठी जिल्हा नियोजन व विकास निधीतून रक्कम देण्यात येईल, असेही भुमरे म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...