आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रलंबित कामांना मिळणार गती:ठाकरे सरकारने मंजूर केला हज हाऊस, वक्फ बोर्ड, उर्दू घरचा प्रलंबित निधी

औरंगाबाद2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • वक्फ बोर्डाला 13 वर्षांनंतर मिळाला निधी

गेली अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या अल्पसंख्याक समाजाच्या प्रकल्पांसाठी भरभरून निधीची तरतूद ठाकरे सरकारने केली आहे. औरंगाबादेतील हज हाऊस आणि वक्फ बाेर्ड तर नांदेडात उर्दू घर उभारण्यासाठी तब्बल ८ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. वक्फ बोर्डाला तर तब्बल १३ वर्षांनंतर निधी मिळत आहे. निधीची अडचण सुटल्याने प्रकल्प मार्गी लागण्यात मदत होणार आहे.

औरंगाबाद शहरातील लेबर कॉलनी भागात हज हाऊस आणि त्याच्या शेजारी वंदे मातरम सभागृह बांधण्याचे काम प्रगतिपथावर आहे. हज हाऊसचे बांधकाम सिडको करत आहे. या कामासाठी २०१० मध्ये १९.५० कोटी, तर २०१४ मध्ये २९.८८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. २०२१-२२ च्या अर्थसंकल्पात हज हाऊससाठी १२ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली. त्यापैकी ३० टक्के म्हणजे ३.६० कोटी रुपये सिडकोकडे वर्ग करण्यास १० मार्च रोजी शासन मान्यता देण्यात आली. यामुळे हज हाऊसच्या बांधकामाला वेग येणार आहे.

केंद्राच्या एका संयुक्त संसदीय समितीने १८ ते २२ जून २००७ दरम्यान शहरात राज्य वक्फ महामंडळ तसेच वक्फच्या मालमत्तांची पाहणी केली हाेती. या भेटीदरम्यान तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी वक्फ बोर्डासाठी १५ कोटी रुपयांचे अनुदान देण्याची घोषणा केली होती. त्या घाेषणेच्या १३ वर्षांनंतर यंदाच्या अर्थसंकल्पात वक्फसाठी १५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. पैकी ३ कोटी ८७ लाख ५२ हजार ६५८ रुपयांचे अनुदान वक्फच्या कार्यकारी अधिकाऱ्यांना सुपूर्द करण्यात आले. हा निधी वक्फची जिल्हा कार्यालये उघडणे, मुख्यालयाची इमारत अद्ययावत करणे, आऊटसाेर्सने कर्मचारी भरणे तसेच अतिक्रमण हटवण्यासाठी यंत्रणा उभी करण्याकरिता खर्च केला जाईल.

हे तर फडणवीस सरकारचेच काम
हज हाऊसच्या कामाला देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळातच वेग आला. कितीही निधी लागला तरी कमी पडू देणार नाही, असे ते म्हणाले होते. त्यांनी नागपूरच्या दर्ग्यासाठी १०० कोटींची तरतूद केली होती. वक्फ बाेर्डासाठी घोषणा करणाऱ्यांनीच निधीची तरतूद करायची होती. ठाकरे सरकार नवीन काही करत नसून आमच्या कामावर रेघोट्या ओढून अल्पसंख्याक समाजाबाबतचा पुळका दाखवत आहे. - नबी पटेल, िजल्हा प्रभारी, भाजप अल्पसंख्याक सेल, औरंगाबाद

नांदेडमध्ये उर्दू घर
नांदेड शहरात मदिनानगर येथे मदिना तूल उलूम शाळेजवळील पालिकेच्या सर्व्हे क्रमांक १२६९२ जागेवर ८ कोटी १६ लाख रुपये खर्चाच्या उर्दू घर प्रकल्पाला फेब्रुवारी २०१४ मध्ये प्रशासकीय मान्यता मिळाली होती. या प्रकल्पाची छाननी केल्यावर हा खर्च १५ कोटी रुपयांपर्यंत गेला. तर उर्दू घरमध्ये फर्निचरसाठी रु. २०,४३,३६२, प्रोजेक्टर व साऊंड सिस्टीमसाठी रु.१३,३०,३२१ तर सीसीटीव्हीसाठी ७,४३,०५८ रुपये अशा ४१,१९,७४१ रुपयांच्या अतिरिक्त खर्चाला सरकारने मंजुरी दिली.

बातम्या आणखी आहेत...