आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मदतीसाठी धाव:आईने मोबाइल न दिल्याने 15 वर्षीय मुलगी दिवसभर फिरून रात्री बसस्थानकात बसली

औरंगाबाद6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आठवीत शिकणाऱ्या पंधरा वर्षीय मुलीने आईकडे मोबाइलचा हट्ट सुरू केला. त्यास आईने नकार दिल्याने रागावून मुलीने घर सोडले. दिवसभर इकडे-तिकडे फिरून रात्री एक वाजता ती सिडको बसस्थानकात बसली. तेवढ्यात काही टवाळखोरांची तिच्यावर नजर पडली. तिला साेबत चालण्यासाठी विचारपूस करू लागले. मात्र, पतीला बसस्थानकावर सोडण्यासाठी गेलेल्या पाेलिस अंमलदार सीमा वानखेडे-ढवळे यांनी हा प्रकार पाहिला. संशय आल्याने त्यांनी तिच्याकडे जात विचारपूस करण्याचा प्रयत्न केला.

मात्र, त्या पोलिस असल्याचे कळताच टवाळखोरांनी धूम ठोकली. वानखेडे यांनी लगेच ११२ वर हा प्रकार कळवला. भरोसा सेलच्या आम्रपाली तायडे यांनी तत्काळ बसस्थानक गाठले. ही मुलगी पुंडलिकनगरात राहते. तिच्या वडिलांनी तिला शोधत शहर पालथे घातले होते. आई रडून त्रस्त झाली होती. तायडे यांनी मुलीला विश्वासात घेऊन विचारपूस केली केली. नंतर तिच्या वडिलांना बोलावून घेत त्यांच्या ताब्यात दिले.

मी पतीला सोडण्यासाठी आले होते, तरुणांचा संवाद ऐकून संशय आला पतीला बाहेरगावी जायचे असल्याने त्यांना सोडण्यासाठी रात्री १ वाजता मी बसस्थानकात गेले. गाडी उभी करून आम्ही बसची वाट पाहत होतो. तेव्हा लहान मुलगी व तिच्या आजूबाजूला चार ते पाच तरुण उभे दिसले. सुरुवातीला नातेवाईक असतील म्हणून दुर्लक्ष केले. मात्र, मला संवाद ऐकू आल्यानंतर जरा संशय आला. एक जण हमारे साथ चलो, मदत करते हैं, असे म्हणत होता, तर दुसरा चलो, चाय पीते हैं, तर कुणी उधर चलो, उधर बैठो असे काहीसे म्हणताना ऐकू आले. मुलगी एकटीच होती. त्यामुळे माझ्या पतीने त्या मुलीसोबत बोल असे सांगितले. मी त्यांच्या दिशेने जात असतानाच त्या तरुणांपैकी एकाने माझ्या वाहनावरील पाेलिसाचे चिन्ह पाहून पळ काढला. तोपर्यंत मी मुलीपर्यंत पोहोचले होते. विचारपूस सुरू करताच इतरांना पोलिस असल्याचे कळताच सर्वांनी पळ काढला. मुलीने नंतर मी परभणीची आहे, भांडण झाल्याने मला घरच्यांनी बाहेर काढले, तुम्ही मला तिकिटासाठी पैसे द्या, माझी आई प्रेसमध्ये आहे, अशी अनेक कारणे सांगायला सुरू केली. मी मोबाइल क्रमांक मागितला तर लक्षात नाही, असे सांगितले. तोपर्यंत माझ्या पतीची बस निघायला लागली होती. मात्र, मुलीला एकटीला सोडणे योग्य नसल्याने आम्ही बस सोडून दिली. त्यानंतर मी ११२ ला संपर्क करून हा प्रकार सांगितला.

काही रिक्षाचालक म्हणाले, ऑटाेत बस तेथील काही रिक्षाचालकांनी ऑटाेत बसण्यासाठी सांगितले. मात्र, वानखेडे यांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली. सीमा वानखेडे या जवाहरनगर पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत. त्यांच्या या कार्यतत्परतेमुळे जवाहरनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक संतोष पाटील यांनी त्यांचे काैतुक केले.

बातम्या आणखी आहेत...