आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साहित्य संमेलन:41 व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे उद्घाटन अशोक चव्हाण यांच्या हस्ते होणार; ​​​​​​​स्वागताध्यक्ष राजेश करपे यांची माहिती

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • जितेंद्र आव्हाडांच्या उपस्थितीत समारोप

४१ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे उद्घाटन माजी मुख्यमंत्री तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते २५ सप्टेंबर रोजी होणार आहे. २६ सप्टेंबर रोजी सायंकाळी समारोपाच्या कार्यक्रमाला राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड उपस्थित राहणार असल्याची माहिती संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. राजेश करपे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. लोकसंवाद फाउंडेशनतर्फे मराठवाडा साहित्य परिषदेचे ४१ वे मराठवाडा साहित्य संमेलन येथील मसापच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात २५ व २६ सप्टेंबर रोजी आयोजित केले आहे. या संमेलनाची माहिती देण्यासाठी मसाप आणि लोकसंवाद फाउंडेशनच्या पदधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद घेण्यात आली.

मसापचे अध्यक्ष तथा अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील, कार्यवाह डॉ. दादा गोरे, कोषाध्यक्ष कुंडलिक अतकरे, आयोजक समितीचे मुख्य कार्यवाह डॉ. राम चव्हाण, समन्वयक डॉ. रामचंद्र कालुंखे, उपाध्यक्ष डॉ. फुलचंद सलामपुरे यांची उपस्थिती होती. उद्घाटनाच्या कार्यक्रमाला आ. सतीश चव्हाण, मसापच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष मधुकर मुळे उपस्थित असणार आहेत. हे संमेलन आयोजित करण्यासाठी अत्यंत कमी कालावधी मिळाला आहे. नियोजनासाठी २५ समित्या बनविण्यात आल्या असून, याशिवाय मुख्य आयोजक समितीही कार्यरत आहे.

संमेलनात ज्वलंत विषयावर ४ परिसंवाद, दोन कविसंमेलने, एक कथाकथन, मुलाखत, सांस्कृतिक कार्यक्रम आणि ग्रंथ प्रदर्शन हे कार्यक्रम आयोजित केल्याचे डॉ. राजेश करपे यांनी सांगितले. मुख्य कार्यवाह डॉ. राम चव्हाण यांनी लोकसंवादच्या बैठकीत डॉ. राजेश करपे यांची बहुमताने संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी निवड केल्याचे सांगितले. यावेळी आयोजक समितीचे सहकार्यवाह डॉ. कैलास अंभुरे, डॉ. गणेश मोहिते, डॉ. बळीराम धापसे, स्मरणिका संपादक डॉ. हंसराज जाधव, सदस्य डॉ. रविकिरण सावंत, प्रा. अर्जुन मोरे, प्रा. बंडू सोमवंशी उपस्थित होते.

कोरोनामुळे ग्रंथ दिंडी रद्द
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मराठवाडा साहित्य संमेलनात सर्वप्रकारची काळजी घेण्यात येत असल्याची माहिती मसापचे अध्यक्ष ठाले पाटील यांनी दिली. त्यामुळे संमेलनात ग्रंथदिंडी काढली जाणार नाही. तसेच कोविडच्या नियमांचे कोठेही उल्लंघन केले जाणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. मराठवाडा साहित्य संमेलन २००१ नंतर तब्बल २० वर्षांनी औरंगाबाद शहरात होत आहे. देगलूरचे संमेलन रद्द झाल्यामुळे तरुण रक्ताच्या युवा प्राध्यापकांना संमेलन आयोजित करण्याची संधी दिली. संमेलनाचे अध्यक्ष साहित्यिक बाबू बिरादर असणार आहेत.

संमेलन स्वागताध्यक्षपदी राजेश करपे, मुख्य कार्यवाह राम चव्हाण
मराठवाडा साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी लोकसंवाद फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. राजेश करपे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. तसेच मुख्य कार्यवाह म्हणून डॉ. राम चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे. आयोजित समितीमध्ये उपाध्यक्ष डॉ. फुलचंद सलामपुरे, डॉ. चेतना सोनकांबळे, समन्वयक डॉ. रामचंद्र काळुंखे, सहकार्यवाह डॉ. कैलाश अंभुरे, डॉ. गणेश मोहिते, कोषाध्यक्ष प्रा. संदीप पाटील, सहकोषाध्यक्ष डॉ. बळीराम धापसे, स्मरणिका संपादक डॉ. हंसराज जाधव यांच्यासह सदस्यपदी डॉ. रविकिरण सावंत, डॉ. मुंजा धोंडगे, डॉ. फेरोज सय्यद, डॉ. शिल्पा जिवरग, डॉ. सर्जेराव बनसोडे, प्रा. अर्जुन मोरे, सुदाम मुळे पाटील, डॉ. शैलेश आकुलवार, प्रा. बंडु सोमवंशी आणि संकेत कुलकर्णी कार्य करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...