आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आढावा:49 दिवसांचा लॉकडाऊन आवश्यक विलगीकरण हाच उपाय, लस तयार करणे सुरू; पूर्ववत होण्यासाठी लागतील 6 महिने

औरंगाबाद3 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • अनेक संशोधक म्हणतात, तापमान वाढताच ‘कोरोना’चा खात्मा, पण एकमत नाही
  • कोविड १९ च्या संकटावर जागतिक स्तरावर अभ्यास, मानसिक रुग्ण २० टक्क्यांनी वाढले

महेश जोशी 

कोरोनाचे संकट नेमके केव्हा संपेल याबाबत जागतिक स्तरावर अभ्यास सुरू आहेत. तपमानात वाढ आणि आर्द्रतेत घट झाली तर या विषाणूचा खात्मा होईल, असे अनेक संशोधकांना वाटतंय. मात्र, कोरोनाचा प्रत्येक देशातील पॅटर्न वेगळा आहे. त्याचा हवामानाशी संबंध जोडणे चुकीचे अाहे. असे संशाेधकांच्या दुसऱ्या गटाचे मत आहे. 

लस शोधण्याचे काम मोठ्या प्रमाणावर सुरू आहे, पण सध्या तरी विलगीकरण हा एकमेव उपाय आहे. 
एका अभ्यासात २१ एेवजी ४९ दिवसांचा लॉकडाऊन हे यावर उत्तर समोर आले आहे. सध्याची परस्थिती पूर्वपदावर येण्यासाठी किमान ६ महिन्यांचा कालावधी लागू शकतो, असेही समोर आले आहे.

जगात चर्चा घडवणारे कोविड १९ बाबतचे ५ अभ्यास

1. अमेरिकेतील मॅसाच्युसेट्स इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलाजीने केलेल्या संशोधनात संसर्ग झालेल्या ९० टक्के केसेस ३ ते १७ डिग्री सेल्सियस तपमान आणि ४ ते ९ ग्राम प्रतिघनमीटर आर्द्रता असलेल्या प्रदेशात झाल्याचे समोर आलेे. ६ टक्के केसेस १८ डिग्री तापमान असलेल्या प्रदेशातील होत्या. त्यामुळे २५ डिग्रीपेक्षा अधिक तापमान झाले तर संसर्ग घटेल. 

2. युनिर्व्हसिटी आॅफ मेरीलँडच्या इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलाजीने केलेल्या संशोधनानुसार ५ ते ११ डिग्री सेल्सियस तापमान आणि कमी आर्द्रता या व्हायरससाठी पोषक ठरते. कोविड-१९ व्यतिरिक्त अन्य कोरोना व्हायरसमुळे उद्भवणारी सर्दी आणि ताप हिवाळ्यात दिसून येते. उन्हाळ्यात याचे परिणाम जाणवत नाहीत.

3. १६ मार्च रोजी प्रकाशित शोधनिबंध स्पेन आणि फिनलँडच्या संशोधकांनी लिहिला आहे. यात ते म्हणतात की, जगातील ९५ टक्के कोविडच्या केसेस उणे २ ते १० डिग्री सेल्सियस तापमान असणाऱ्या प्रदेशात आढळल्या. हा व्हायरस यापेक्षा अधिक तपमानात टिकत नाही.

4. कोरोनाची सुरुवात झालेल्या चीनमधील बीहांग युनिव्हर्सिटीमध्ये झालेल्या संशोधनात उष्ण हवामानाच्या शहरांच्या तुलनेत थंड शहरात कोविडचा संसर्ग अधिक वेगाने होत असल्याचे म्हटले आहे. अगदी एक डिग्रीही तापमान वाढले तरी तरी कोविडचा प्रसार मंदावतो, असे हे संशोधन सांगते.

5. चीनमध्येच झालेल्या एका अन्य संशोधनानुसार ५ डिग्री सेल्सियसपेक्षा १ डिग्री तपमान वाढत गेले तर कोरोनाचे प्रमाण १.२% घटते.

विलगीकरण हा एकमेव उपाय

डॉ.गर्गे म्हणाले, जिवंत पेशींच्या बाहेर हा विषाणू निर्जीव असताे. पण, स्वत:ची वाढ करणे, स्वत:त बदल घडवणे अशा युक्त्या ही रसायने विविध क्रिया करून अमलात आणतात. कोविड १९ विषाणूला वाढण्यासाठी जिवंत पेशींचा संपर्क लागतो. तर, अजैविक वस्तूंवर वाढीला संधी नसल्याने तो ८-९ तासांत नष्ट होतो. म्हणूनच विलगीकरण हाच नियंत्रण आणण्याचा उपाय आहे.

...यांचा मात्र विरोध | तापमानाचा परिणाम नाही

निवृत्त प्राचार्य , मराठी विज्ञान परिषदेचे संयोजक, प्रसिद्ध सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ डॉ.रंजन गर्गे म्हणाले, कोविड १९चा विषाणू ५७ डिग्री सेल्सियस तपमानावर नष्ट होतो. मात्र, भारतात ४५ ते ५० च्या वर तापमान नसते. यामुळे उन्हाळा वाढल्यावर किंवा आर्द्रतेत घट झाल्यावर त्याचा परिणाम संपेल असे म्हणने चुकीचे आहे.

लस तयार करणे सुरू

देवी, पोलिओ, कांजण्या, नागीण, स्वाइन फ्लू, बर्ड फ्लू यांसारख्या दुर्धर समजल्या जाणाऱ्या विषाणूंच्या रहस्याचा भेद करण्यात शास्त्रज्ञांना यश मिळाले आहे. देवी आणि पोलिओसारखे रोग पृथ्वीवरून पूर्णपणे नष्ट झाले. कोविड १९ चा विषाणू पृथ्वीतलावर नवीन असल्याने त्यापासून लढण्याची प्रतिकारशक्ती कोणामध्येही नाही. त्यापासून संरक्षणाचे दोन उपाय आहेत.-

1. कोविड १९ चा सौम्य संसर्ग झाल्यास शरीरात त्याच्याशी लढण्याचे प्रतिद्रव्य - अँटीबॉडीज तयार होऊन प्रतिकारशक्ती तयार होते. पण, हा संसर्ग मोठा असेल तर रुग्णाचा मृत्यू होऊ शकतो. जे या रोगातून बरे झाले त्यांच्यात नैसर्गिक प्रतिकारशक्ती आली आहे.

2. दुसरा उपाय कृत्रिम प्रतिकारशक्ती निर्माण करणे. हा विषाणू आधी घशाजवळील पेशींना लक्ष्य करतो. नंतर श्वसननलिका आणि फुप्फुसांवर हल्ला चढवतो. विषाणूंच्या संख्येत वाढ होते. ते इतर पेशींवर हल्ला चढवतात. मेंदू शरीराला अलर्ट करतो. नंतर शरीर स्वतः सायटोकाइन नावाचे रसायन स्रवू लागते. हे आक्रमण रोखण्यासाठी लसीद्वारे कृत्रिम प्रतिकारशक्ती तयार करता येते.

...असा होईल लसीचा परिणाम

व्हायरसच्या काटेरी भागावर एस प्रोटीन्स असतात. ते फुप्फुसाच्या पेशीवरील रिसेप्टरला चिकटतात. यामुळे व्हायरस व फुप्फुसाच्या पेशीतील भिंत विरघळून फुप्फुस पेशीत शिरतो व संसर्ग करतो. यामुळे श्वसनाची क्रिया मंदावते. मात्र, कृत्रिम मोनोक्लोन अँटीबॉडीमधील एस प्रोटीन्स चिकटतात. यामुळे फुप्फुस पेशीवरील एसीई-२ रिसेप्टरशी कोरोना व्हायरसचे मिलन होत नाही. त्यामुळे संसर्ग टळतो. सध्या जिओव्हॅक्स आणि ब्रॅव्होव्हॅक्स या दोन कंपन्या अशा प्रकारची लस तयार करत असल्याची माहिती डॉॅ.गर्गे यांनी दिली.

इंग्लंडच्या सेंटर फॉर इकॉलॉजी अँड हायड्रोलॉजीतील डिसिज इकॉलॉजी ग्रुपचे प्रमुख संशोधक बेठन पर्स यांना तापमान, आर्द्रता आणि कोरोनाचा संबंध जोडणे मान्य नाही. ते म्हणतात, वरील अभ्यास करताना सार्स या पूर्वीच्या व्हायरसच्या वर्तवणुकीचा विचार करण्यात आला. कोविड-१९ नवीन आहे. त्याचे परिणाम त्या-त्या भागातील जीवनशैली, रोगप्रतिकारशक्ती, आरोग्य व्यवस्था यावर आधारित आहेत. त्यांचा तपमानाशी संबंध नाही.

४९ दिवसांचा लॉकडाऊन

केंब्रिज विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ अप्लाइड मॅथेमॅटीक्स अँड थिअरॉटिकल फिजिक्समधील भारतीय वंशाचे संशोधक रोनोजॉय अधिकारी आणि राजेश सिंग यांनी गणितीय मॉडेलवरून २१ नव्हे तर ४९ दिवसांचा लॉकडाऊन आवश्यक असल्याचे सांगितले आहे. हे मॉडेल तयार करताना त्यांनी भारताची लोकसंख्या, वय, लोकसंख्येची घनता आणि कोविडच्या प्रसाराची पद्धत विचारार्थ घेतली आहे.

८३% नागरिक समाधानी

कोरोनाशी दोन हात करण्यासाठी सरकार करत असलेले उपाय देशाच्या ८३ टक्के नागरिकांना समाधानकारक वाटतात. आयएएनएस-सी व्होटर आणि गॅलप इंटरनॅशनलने दोन आठवडे सर्व राज्ये, १० भाषांत केलेल्या टेलिफोनीक सर्वेक्षणातून ही बाब समोर आली. ९.४ टक्के लोकांना त्यांचा उपयोग वाटत नाही. याच पाहणीत ९४.३ टक्के नागरिकांनी एकही लक्षण नसल्याचे, तर ५.७ टक्के लोकांनी लक्षण जाणवत असल्याचे सांगितले. 

पूर्ववत होण्यासाठी ६ महिने

२१ दिवसांच्या लॉकडाऊनमुळे व्यवसाय ठप्प आहे. यातून सावरण्यासाठी किमान ६ महिने लागू शकतात, असा अंदाज उद्योजकांची संघटना फिकीने वर्तवला आहे. ४२ टक्के कंपन्यांनी परिस्थिती पूर्ववत होण्यासाठी ३ महिने, तर ४७ टक्के कंपन्यांना ६ महिने आवश्यक वाटतात. तर किमान वर्षभर परिस्थिती सुधारणार नसल्याचे ६ टक्के कंपन्यांना वाटत आहे.

मानसिक आजाराचे रुग्ण २० टक्क्यांनी वाढले

कोरोनामुळे मानसिक आजाराच्या रुग्णांत २० टक्क्यांनी वाढ झाल्याचे इंडियन सायकेट्री सोसायटीच्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. गेल्या महिनाभरात ५ पैकी एकाला हा आजार जडला आहे. नोकरी, व्यवसायावर गंडांतर येईल, दैनंदिन गरजेच्या वस्तू मिळतील काय, बचत संपेल का, घर चालेल का? असे प्रश्न त्यांना पडले आहेत. सोबतच चिंता, अल्कोेहोल विथड्रॉल सिंड्रोम, घबराट, बेचैनीने त्यांना घेरले आहे.

बातम्या आणखी आहेत...