आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फसवणूक प्रकरण:तरुणांची फसवणूक करून घेतलेल्या पैशातून आरोपीने उत्तर प्रदेशात स्थापन केली कंपनी; करायचा रस्त्याची कामे

हिंगोलीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • दोन वर्षांतील संपर्कातील व्यक्तींची चौकशी

देशभरातील तरुणांची नोकरी लावण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या टोळीतील मुख्य आरोपी समजल्या जाणाऱ्या शैलेशकुमार दुबे (रा. उत्तर प्रदेश) यास वसमतच्या न्यायालयाने ५ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. त्याने तरुणांकडून घेतलेल्या पैशातून उत्तर प्रदेशात कंपनी स्थापन केल्याची माहिती पोलिस तपासात पुढे आली आहे.

देशातील हजारो तरुणांना नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या टोळीतील आठ जणांना हिंगोलीच्या स्थानिक गुन्हे शाखा व वसमत पोलिसांच्या पथकाने अटक केली आहे. यापूर्वी सात जणांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर शनिवारी आंध्र प्रदेशातील कर्नूल येथून शैलेशकुमार दुबे (रा. उत्तर प्रदेश) यास अटक केली. त्याला आज वसमतच्या न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याची ५ जुलैपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली आहे. दरम्यान, प्रभारी पोलिस अधीक्षक यशवंत काळे,

सहायक पोलिस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वसमतचे पोलिस निरीक्षक शिवाजी गुरमे, सहायक पोलिस निरीक्षक पंढरीनाथ बोधनापोड, उपनिरीक्षक बरगे यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक उदय खंडेराय, उपनिरीक्षक शिवसांब घेवारे, किशोर पोटे यांच्या पथकाने प्रत्येकाची स्वतंत्रपणे चौकशी सुरू केली आहे. या प्रत्येकाकडून शैलेशकुमार दुबे याच्याकडेच पैसे पोहोचवण्यात आल्याचे स्पष्ट होऊ लागले आहे, तर दुबे यानेही काही जणांचे पैसे घेतल्याचे प्राथमिक चौकशीत कबूल केले आहे.

दरम्यान, पोलिसांनी अधिक माहिती घेतली असता शैलैशकुमार याने तरुणांकडून मिळलेल्या पैशातून उत्तर प्रदेशात एक कंपनीदेखील सुरू केली. या कंपनीच्या माध्यमातून रस्ते व इतर कामांच्या निविदा भरल्या जात होत्या. निविदा प्रक्रियेनंतर काम मिळाल्यानंतर हा पैसे कामासाठी वापरले जात असल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले आहे. तसेच बनावट शिक्के, लेटरपॅडचाही त्याच्याकडूनच वापर होत असल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले आहे. हिंगोली पोलिसांनी पकडलेल्या या टोळीची मोठी साखळीच असून यामध्ये आणखी काही जणांचा शोध सुरू आहे. दुसरीकडे स्थानिक पातळीवर त्यांना मदत करणारे दलाल भूमिगत झाले असून पोलिसांनी या दलालांचाही शोध सुरू केला आहे.

दोन वर्षांतील संपर्कातील व्यक्तींची चौकशी
या प्रकरणात मोठी साखळी ताब्यात घेतल्यानंतर आता पोलिसांनी २ वर्षांपासून या आरोपींच्या संपर्कात असलेल्या व्यक्तींची चौकशी करण्याची तयारी सुरू केली आहे. सतत संपर्कात असलेेली व्यक्ती एकतर फसवणूक झालेली असावी किंवा या टोळीतील असावी, असा संशय पोलिसांना आहे.

बातम्या आणखी आहेत...