आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायुवकांना रोजगारक्षम करणे, नोकरी मागणारा नव्हे तर नोकरी देणारा बनवणे, उद्योगावर आधारित कौशल्य शिक्षणाचा अंतर्भाव नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात आहे. विद्यार्थ्यांनी या संधीचे सोने केले तर रोजगाराचे प्रमाण नक्की वाढेल, असा आशावाद डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वाणिज्य व व्यवस्थापनशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता, ऑल इंडिया कॉमर्स काॅन्फरन्सचे अध्यक्ष डॉ. वाल्मीक सरवदे यांनी व्यक्त केला.
इंडस्ट्रियल मेंटॉर, व्यवस्थापनशास्त्र विभाग, विद्यापीठातील ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलतर्फे आयोजित ‘इंडस्ट्री-अकॅडमिया समिट-२०२३’चे शनिवारी (४ मार्च) आयोजन करण्यात आले होते. डॉ. सरवदे यांनी या परिषदेचा अध्यक्षीय समारोप केला. त्या वेळी ते बोलत होते. पीपल अँड कल्चर हेल्प शिफ्टचे ग्लोबल हेड सरबजित सिंग, आयटी लीडर अँड बिझनेसचे युनिट हेड धीरजकुमार, जॉन्सन अँड जॉन्सनच्या एचआरचे इंडिया हेड अनुराग कल्याणी यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती.
डॉ. सरवदे म्हणाले, ‘नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण कौशल्य शिक्षणाचा पुरस्कार करणारे आहे. उद्योग आणि विद्यापीठ, उद्योग आणि कॉलेज, उद्योग आणि अभियांत्रिकी संस्था, असे कोलॅबरेशन राहणार आहे. विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना प्रत्यक्ष उद्योग क्षेत्रात काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. विद्यार्थ्यांनी परिश्रमपूर्वक शिक्षण घेऊन करिअरवर लक्ष केंद्रित करावे.’ सरबजितसिंग म्हणाले, ‘विद्यार्थ्यांनी उत्साही राहावे व स्वत:मध्ये चिकित्सक वृत्ती विकसित करावी. आहे ते स्वीकारण्याऐवजी चिकित्सा करायला विद्यार्थ्यांनी शिकले पाहिजे.’
‘उद्योग क्षेत्रात टिकाव धरण्यासाठी स्वत:ला सिद्ध करता आले पाहिजे,’ असे धीरजकुमार यांनी सांगितले. अनुराग कल्याणी यांनी असे आवाहन केले की, ‘स्पर्धेच्या युगात सकारात्मक राहणे कठीण आहे. पण, आजूबाजूच्या नकारात्मक घडामोडींकडे दुर्लक्ष करून सकारात्मक राहण्याचे कौशल्य आत्मसात करावे.’ व्यवस्थापनशास्त्र विभागाचे संचालक डॉ. मोहंमद फारुख खान यांनी प्रास्ताविक केले. डॉ. रिहाना फिरोज सय्यद यांनी पहिल्या सत्राचे सूत्रसंचालन केले. डॉ. श्वेता राजळे यांनी आभार मानले.
नोकरीच्या संधीवर चर्चासत्र दुसऱ्या सत्रात उज्ज्वला जाधव, अमोल न्यायाधीश, एक्स्पर्ट ग्लोबल सोल्युशनचे विशाल जाधव, ऋचा इंजिनिअरिंगचे संजय कपाते, प्रोक्युस्ट सोल्युशनचे शंतनू पुराणिक, केएसजे टेक्नॉलॉजीच्या रश्मी बाविस्कर यांनी नोकरी मिळवण्यासाठी अंगी संवाद कौशल्य कसे बाळगावे, याविषयी मार्गदर्शन केले. ‘नोकरीच्या संधी व त्यासाठी लागणारी कौशल्ये’ या विषयावर हे चर्चासत्र घेण्यात आले होते. टीपीओ डॉ. गिरीश काळे, इंडस्ट्रियल मेंटॉरचे सीईओ कल्पेश शेवाळे, प्रा. सतीश भालशंकर यांनी समिट यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.