आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअरबी समुद्र, बंगालचा उपसागर आणि हिंद महासागरातील भूपृष्ठ पाण्याचे तापमान २ अंशांपर्यंत वाढले आहे, तर प्रशांत महासागरातील तापमान कमी झाले आहे. परिणामी तापमान वाढले आहे. कमी हवेचा दाब निर्माण होऊन अस्थिर हवामान निर्माण झाल्याने काही ठिकाणी पाऊस पडतोय. मात्र, आता पावसाचे प्रमाण कमी होऊन थंडीचा जोर हळूहळू वाढत जाणार आहे. जानेवारीत तापमान नीचांकी पातळीवर जाण्याची शक्यता हवामानशास्त्रज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी वर्तवली आहे.
डिसेंबरमध्ये पाऊस पडत नाही. थंडीचा कडाका वाढलेला असतो. मात्र, यंदाचा डिसेंबर त्याला अपवाद ठरला. औरंगाबादेत १५ डिसेंबर रोजी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास मेघगर्जनेसह धो धो ३६.३ मिमी पाऊस पडला. तसेच ढगांची दररोज गर्दी होत आहे. तापमानात दहा अंशांपर्यंत वाढ झाली होती. म्हणजेच आठ दिवसांपूर्वी शुक्रवारी ७.९ तर शनिवारी ७.५ अंश नीचांकी पातळीवर गेलेले तापमान गुरुवारी १८ अंशांपर्यंत वाढले होते. शुक्रवारी ते १६.० अंश सेल्सियसवर नोंदवले गेले. डॉ. साबळे म्हणाले, अरबी समुद्र, बंगालचा उपसागर आणि हिंद महासागरातील भूपृष्ठ पाण्याचे तापमान वाढल्याने कमी हवेचा दाब निर्माण होतो. चक्राकार वारे वाहतात.
अवेळी अवकाळी पावसासाठी अनुकूल वातावरण तयार होत आहे. त्यामुळे गत तीन दिवसांपासून आकाशात ढग घोंगावताहेत. तुरळक ठिकाणी जेथे सापेक्ष आर्द्रता १०० टक्के राहिली तेथेच पाऊस पडला. मात्र, आता पावसाची स्थिती निवळत जाईल व थंडीचा कडाका वाढेल. विशेषत: जानेवारीत पारा नीचांकी पातळीवर जाण्याची शक्यता आहे.
तापमानात ४ अंशांपर्यंत वाढ ढगाळ वातावरणामुळे कमाल तापमान सरासरीच्या तुलनेत ३ अंशांनी वाढ होऊन ते शुक्रवारी ३१.६ अंश, तर किमान तापमानात सरासरीपेक्षा ४ अंशांनी वाढून १६ अंश सेल्सियस नोंदवले गेले. परिणामी सौम्य थंडी, उकाडा आणि दमट वातावरण राहत आहे.
ला निनाचा प्रभाव तीन समुद्रातील भूपृष्ठ पाण्याचे तापमान वाढते तर प्रशांत महासागरातील कमी होते. परिणामी तिकडे हवेचा दाब वाढतो तर आपल्याकडे कमी होतो. त्यामुळे तापमान वाढते व ढगांची गर्दी होऊन पाऊस पडतो. यालाच ला निनाचा प्रभाव म्हणतात, असेही डॉ. साबळे यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.