आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापंतप्रधान मोदींच्या महत्त्वाकांक्षी घरकुल योजनेला औरंगाबाद शहरात हरताळ फासला जात आहे. १७ सप्टेंबर २०२० रोजी या योजनेत गरिबांसाठी ५० हजार घरे बांधण्याचा पहिला निर्धार झाला. प्रत्यक्षात ८२१ दिवसांत एक वीटही लागली नाही. तीन उच्चस्तरीय बैठका होऊन निविदा प्रक्रिया आणि ठेकेदाराच्या चौकशी आदेशापलीकडे काहीही झाले नाही. दोन अधिकाऱ्यांच्या अहंकारात ही योजना अडकल्याचे समोर आले आहे. केंद्रीय मंत्रीही त्यापुढे हतबल झाले आहेत.
खासदार इम्तियाज जलील यांनी लोकसभेत घरकुल योजनेविषयी प्रश्न उपस्थित केला होता. त्या पार्श्वभूमीवर ‘दिव्य मराठी’ने माहिती घेतली असता २ अधिकाऱ्यांनी नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर सांगितले की, घरकुल योजनेत खुली जागा उपलब्ध करून देणे महत्त्वाचे असते. पण त्या वेळी पांडेय यांनी निविदा अटीत (क्र. १७.५) त्याविषयी मनपाची भूमिका स्पष्ट केली नाही. अतिक्रमणे हटवण्याचे काम सुरू असेपर्यंत निर्विवाद उपलब्ध जमिनीवर बांधकाम सुरू करावे, असे निर्देश त्या अटीत दिले असते. तर ठेकेदाराने अनामत रक्कम भरून बांधकाम सुरू केले असते. पण त्या आता सध्याच्या निविदेतील अटीनुसार ठेकेदाराला सर्व अतिक्रमणे हटवून हवी आहेत आणि हे काम मनपाला सध्या तरी अशक्य आहे.’
ताठर भूमिकेमुळे अडथळे
निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्याने आता अटीत बदल शक्यही नाही, असा पांडेय यांचा आग्रह असल्याचे सूत्रांनी सांगितले. तर अट बदलल्याशिवाय काम होणार नाही. आणि याची जबाबदारी निश्चित झाली पाहिजे, अशी मनपा आयुक्त अभिजित चौधरी यांची भूमिका आहे. दोघेही तसूभर मागे सरकण्यास तयार नसल्याचा अनुभव केेंद्रीय मंत्र्यांना नुकताच एका बैठकीत आला. ८०० घरांचे तरी बांधकाम सुरू करावे, हा मंत्र्याचा आदेश अमलात आणण्यासही नकार मिळाला.
चौकशी समितीला सांगेन : पांडेय
‘निविदेतील अटींबाबत काही जणांना आक्षेप आहे. पण त्याविषयी मी काहीही बोलणार नाही. जे काही सांगायचे ते चौकशी समितीला सांगेन’, असे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय म्हणाले.
अडचणी आहेत, पण लवकरच दूर होतील : डाॅ. भागवत कराड
‘दिव्य मराठी’ने विचारणा केल्यावर केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड म्हणाले की, निविदेत टाकण्यात आलेल्या काही अटींमुळे गुंतागुंत झाली. त्याविषयी मनपा आयुक्त डाॅ. अभिजित चौधरी व पांडेय यांच्या काही भूमिका आहेत. त्यामुळे योजनेत अडचणी येत आहेत. पण लवकरच मी बैठक घेऊन त्या दूर करेन.’
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.