आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंत्र्यांकडून निराशा:राज्यातील प्राध्यापकांच्या रिक्त जागा भरण्याची घोषणा हवेतच; आठ दिवसांत आदेशाचे आश्वासन विसरले

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वीलेखक: शेखर मगर
  • कॉपी लिंक
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या 73 जागा भरणार

‘प्राध्यापकांच्या रिक्तपैकी ४० टक्के जागा भरण्याचा शासन निर्णय आठ दिवसांत काढू,’ अशी घोषणा उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी केली होती. या घोषणेला आता दाेन महिने हाेत आहेत. पण अजूनही प्राध्यापक भरतीचा तिढा सुटला नाही. तत्कालिन मंत्री विनोद तावडे यांनी नोव्हेंबर २०१८ दरम्यान १,४०० पदे भरली होती. त्यानंतर तीन वर्षांपासून सीएचबी, नेट, सेट, पीएचडी अर्हताप्राप्त उमेदवार भरतीकडे डोळे लावून बसले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ५ जून राेजी झालेल्या ऑनलाइन दीक्षांत समारंभात मंत्री उदय सामंत यांनी राज्यातील प्राध्यापक भरतीचे धोरण जाहीर केले होते.

प्रत्यक्षात मात्र दोन महिने होत आले तरीही पुढे काहीच झाले नाही. या पार्श्वभूमीवर ‘दिव्य मराठी’ने राज्यातील रिक्त जागांचा आढावा घेतला तर धक्कादायक वास्तव पुढे आले. राज्यात अजूनही २० वर्षांपूर्वीचाच आकृतिबंध मंजूर आहे. १ ऑक्टोबर २०१७ रोजी विद्यार्थी संख्येनुसार आकृतिबंधाला तत्त्वत: मंजुरी दिली खरी; पण त्यासाठी पुढे काहीच धोरण ठरवले नव्हते. तरीही ऑक्टोबर-२०१७ नुसारच्या आकृतिबंधात १,१७१ अनुदानित महाविद्यालयांत १७,५०० सहायक प्राध्यापकांची पदे रिक्त आहेत. या जागांचा शासनाने मागील ५ वर्षांत कधीही विचार केलेला नाही.

दरम्यान, तत्कालीन उच्च व तंत्रशिक्षणमंत्री तावडे यांनी नोव्हेंबर-२०१८ मध्ये ९,५११ जागांपैकी ३,५८३ रिक्त जागा भरण्याचा निर्णय घेतला होता. प्रत्यक्षात १८ टक्क्यांप्रमाणे फक्त १,४०० पदे भरली. शासन निर्णयातील ३,५८३ पैकी २,१८३ पदे अद्यापही रिक्त आहेत. यात ८८९ जागांची भर टाकून मंत्री सामंत ३०७४ जागांचा शासन निर्णय जारी करणार होते. ८,१०० जागांच्या तुलनेत ही पदे ४० टक्के आहेत. पण रिक्त जागांच्या पदमान्यतेनंतर वित्त विभागाच्या परवानगीसाठी फाइल अर्थ व नियोजन विभागात प्रलंबित असल्याचे कारण आता सामंत देत आहेत.

अकरा विद्यापीठांतही रिक्त जागांचे प्रमाण अधिक
राज्य सरकारच्या अंतर्गत येणारी महाराष्ट्रात एकूण २० विद्यापीठे आहेत. त्यापैकी ५ कृषी, आरोग्य विज्ञान विद्यापीठ, मुक्त विद्यापीठ आणि तंत्रशिक्षण प्रत्येकी एक अशी तीन विद्यापीठे आहेत. नागपूरला एक संस्कृत विद्यापीठ आहे. त्याशिवाय ११ प्रादेशिक अकृषी विद्यापीठे आहेत. या विद्यापीठांमध्ये साधारणत: १,५७२ प्राध्यापकांच्या जागा रिक्त आहेत. त्यापैकी ४० टक्के म्हणजे ६२९ जागा भरण्यासंदर्भात स्वतंत्र शासन निर्णय राहणार आहे. शिवाय कॉलेजांच्या ज्ञानस्रोत केंद्र अर्थात ग्रंथालयातील १२१ ग्रंथपालांच्या जागाही भरण्याची शक्यता आहे. यासंदर्भात जाणून घेण्यासाठी ‘दिव्य मराठी’ने पुण्यातील उच्च शिक्षण संचालक डॉ. डी. आर. माने यांच्याशी संपर्क केला असता, त्यांच्याकडून प्रतिसाद मिळू शकला नाही.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ७३ जागा भरणार
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात एकूण २५९ जागा रिक्त आहेत. त्यापैकी १३० कार्यरत असून १२९ जागा रिक्त आहेत. रिक्तपैकी ४० टक्के अर्थात ७३ जागा भरण्याची प्रक्रिया सुरू केली होती. मार्च-२०२० दरम्यान कोरोना संसर्गामुळे ही प्रक्रिया रखडली. आता मंजूर ७३ जागांवर नेट, सेट, पीएचडी अर्हताप्राप्त नियुक्तीसाठी प्रतीक्षेत आहेत.

फाइल अर्थ व नियोजन विभागात आहे, लवकरच ताेडगा निघेल
प्राध्यापक भरतीबाबात माझ्याकडून मी सर्व क्लिअर करून फाइल अर्थ व नियोजन विभागाच्या अंतिम मान्यतेसाठी पाठवली आहे. त्याला खूप दिवस झाले आहेत. यासंदर्भात अर्थमंत्री अजित पवार यांच्याशी मला चर्चा करावी लागणार आहे. सध्या पूरग्रस्तांना मदतीच्या कामामध्ये आम्ही व्यग्र आहोत. पण लवकरच या विषयावरही तोडगा निघेल. - उदय सामंत, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री

सध्या टोलवाटोलवी सुरू
मंत्री सामंत आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्यासमवेत बैठक झाली. सामंत म्हणतात, ‘माझ्याकडून क्लिअर झाले आहे. अर्थ विभागात फाइल प्रलंबित आहे.’ तर पवार म्हणतात, ‘माझ्याकडे एकही फाइल पेंडिंग नाही. तुमची कुणी तरी दिशाभूल करत आहे.’ आता या सरकारमध्येच समन्वय नाही, तर आम्ही काय करायचे? तासिका तत्त्वावरील मानधनही २५ टक्क्यांनी वाढवण्याची घोषणा सामंत यांनी केली होती. विश्वास कुणावर ठेवायचा? - प्रा. संदीप पाथ्रीकर, अध्यक्ष, महाराष्ट्र नवप्राध्यापक संघटना

बातम्या आणखी आहेत...