आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासध्या दहावी, बारावीच्या लेखी परीक्षा सुरू असून ३ मार्च रोजी बारावीच्या परीक्षेत एका केंद्रावर विद्यार्थी उत्तरपत्रिकाच घेऊन पळून गेल्याचा प्रकार उघडकीस आला होता. त्यामुळे सोमवारी होणाऱ्या दहावीच्या इंग्रजीच्या पेपरला कडक बंदोबस्त असेल, केंद्रांवर कसून तपासणी होईल, असे वाटले होते. परंतु, शहरातील बहुतांश केंद्रांवर शिक्षण मंडळाचे भरारी पथक, बैठे पथक फिरकलेच नाही. त्यामुळे शहरात कॉपीमुक्ती अभियान यशस्वी हाेत असले तरी ग्रामीण भागात मात्र कॉप्यांचा सुळसुळाट कायम असल्याचे चित्र इंग्रजीच्या पेपरमध्ये पाहायला मिळाले. पैठणमधील एका केंद्रावर तर चक्क एका तरुणाने बाहेरून विद्यार्थ्यांना गाइड फेकून कॉपी करण्यासाठी प्रोत्साहन दिल्याचा प्रकार समोर आल्याचे खुद्द शिक्षण अधिकाऱ्यांनी सांगितले.
६ मार्च रोजी दहावीचा इंग्रजी विषयाचा पेपर होता, तर बारावीचा सहकार विषयाचा पेपर होता. परीक्षा केंद्रावर सकाळी १० वाजेपासून परीक्षार्थी उपस्थित होते. १०:३० वाजेनंतर प्रवेश न देण्याच्या सूचना असल्याने केंद्रांवर तशी व्यवस्था होती. कॉपीमुक्त परीक्षेसाठी मंडळाने विविध भरारी पथके नेमल्याचे सांगितले होते. परंतु, शहरात अनेक केंद्रांवर ना भरारी पथक, ना बैठे पथक फिरकले. अनेक केंद्रप्रमुखांनी पथकांनी हजेरी लावली नसल्याचेही सांगितले. मात्र, केंद्रावर कडक पोलिस बंदोबस्त होता. विद्यार्थ्यांची एका बाकावर एक अशी बैठक व्यवस्था केली. कक्षाबाहेर विद्यार्थ्यांच्या बॅगा ठेवल्या होत्या. काही केंद्रांवर एकाच ठिकाणी त्यासाठी व्यवस्था केली.
१७ संवेदनशील केंद्रांवर बैठे पथक, कडक पोलिस बंदोबस्त शहरापेक्षा ग्रामीण भागात कॉपीचे प्रकार अधिक होत असून दौलताबाद, अंबेलोहळ, बोकूड जळगाव, पैठण, कन्नड येथील काही केंद्रांवर मोठ्या प्रमाणात कॉपीचे प्रकार समोर आले आहेत. इंग्रजीच्या पेपरला जिल्ह्यातील ग्रामीण भागात १७ संवेदनशील केंद्रांवरच बैठे पथक पूर्ण वेळ होते, असे शिक्षण अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र, शहरातील अनेक केंद्रांवर कोणतेही पथक आले नसल्याचे केंद्रप्रमुखांनी सांगितले.
विद्यार्थ्यांना पादत्राणे परीक्षा कक्षाबाहेर ठेवावी लागली अनेक केंद्रांवर विद्यार्थ्यांना पादत्राणे कक्षाबाहेर ठेवावी लागली. शहरात कॉपी केेसेस आढळून येत नसल्या तरी ग्रामीणमध्ये मात्र सर्रास कॉपीचे प्रकार सुरू आहेत. काही केंद्रांवर तर शिक्षकच विद्यार्थ्यांना तोंडी उत्तरे सांगत असल्याचे समोर आले आहे. पैठण तालुक्यात मात्र केंद्राबाहेर विद्यार्थ्यांच्या नातेवाइकांचा त्रास होत आहे. बाहेरून कॉप्या फेकल्याचे प्रकार समोर आल्याने पोलिसांना कळवल्याचेही शिक्षणाधिकारी एम. के. देशमुख यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.