आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादेत नेत्यांतच लढत:तीन मंत्री, एका आमदाराच्या गटबाजीमुळे अडकली भाजपच्या शहराध्यक्षाची नियुक्ती

औरंगाबाद25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्याकडे प्राथमिक मुलाखतीनंतर सहा जणांमध्ये स्पर्धा तीव्र
  • डाॅ. कराड, सावे एका, बागडे दुसऱ्या तर दानवे तिसऱ्या बाजूला

केेंद्र आणि राज्यामध्ये सत्तेत असलेल्या भाजपच्या शहराध्यक्षपदाची नियुक्ती दिवाळीच्या तोंडावर करण्याची प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची तयारी होती. पण तीन मंत्री आणि एका आमदाराच्या गटबाजीमुळे ती अडकून पडली आहे. भाजपमध्ये अलीकडील काळात अत्यंत महत्त्व प्राप्त झालेल्या या पदासाठी सहा जणांमध्ये तीव्र स्पर्धा आहे.

२०१४ पर्यंत ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे त्यांना योग्य वाटेल त्या कार्यकर्त्याच्या गळ्यात शहराध्यक्षपदाची माळ घालायचे आणि बाकी सर्वजण त्याला मान्यता द्यायचे. अर्थात आमदार हरिभाऊ बागडे यांच्याही शब्दाला वजन होते. त्यांच्याशी सल्लामसलत करूनच मुंडे अंतिम निर्णय घेत होते. पण आता स्थिती बदलली आहे. मुंडेंच्या पश्चात शहरामध्ये केंद्रीय मंत्री डाॅ. भागवत कराड, रावसाहेब दानवे, सहकारमंत्री अतुल सावे आणि बागडे असे गट तयार झाले आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार डाॅ. कराड आणि सावे यांनी शिवाजी दांडगे, अनिल मकरिये यांच्यासाठी आग्रह धरला आहे. रावसाहेब दानवेंनी त्यांचे वजन माजी उपमहापौर प्रमोद राठोड यांच्या बाजूने टाकले आहे. राठोड होणार नसतील तर किशोर शितोळेही त्यांना चालतील. तर बागडेंना माजी उपमहापौर राजू शिंदे यांना या पदावर विराजमान करण्याची इच्छा आहे. मावळते शहराध्यक्ष, विद्यमान प्रदेश सरचिटणीस संजय केणेकर गटबाजीत नसले तरी त्यांनी माजी नगरसेवक समीर राजूरकर उपयुक्त ठरतील, असे मत प्रदेशाध्यक्षांकडे नोंदवले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

कुणासाठी कोण आणि का महत्त्वाचे { डाॅ. कराड, सावे यांच्या मते मकरिये, दांडगे दीर्घकाळापासून भाजपसोबत आहेत. शिवाय ते ऐकण्यातीलही आहेत. { रावसाहेब दानवे यांनीच राठोड यांना भाजपमध्ये आणल्याने ते त्यांच्या पाठीशी आहेत. { बागडे यांचे अत्यंत निष्ठावंत म्हणून राजू शिंदे ओळखले जातात. { मनपामध्ये ठसा उमटवलेले आणि आक्रमक तरुण नेते म्हणून राजूरकर यांना संधी मिळावी, असा केणेकरांचा सूर असल्याचे म्हटले जाते.

बातम्या आणखी आहेत...