आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावेरूळ येथील १० क्रमांकाच्या विश्वकर्मा लेणीमध्ये मार्चमध्ये तथागत गौतम बुद्धांच्या मूर्तीच्या चेहऱ्यावर झरोक्यातून पडणारी सूर्यकिरणे पर्यटकांना आकर्षित करतात. प्रत्यक्षात या स्थापत्यशास्त्रानुसार झरोक्यातून नव्हे तर लेणीच्या दरवाजातून किरणोत्सव अपेक्षित आहे. दरवर्षी दरवाजातून सूर्यकिरणांनी केवळ चेहराच नव्हे, संपूर्ण मूर्ती प्रकाशमान होते. मात्र, लेणीसमोरील झाडांमुळे त्यात अडथळा येत असल्याचा दावा खगोलशास्त्राचे अभ्यासक श्रीनिवास औंधकर यांनी केला आहे. ही झाडे कापली तर तांबूस रंगात न्हाऊन निघालेली मूर्ती दिसू शकेल. या किरणोत्सवावरून लेणीचे अचूक वय शोधण्याची तयारीही औंधकर यांनी केली आहे.
लेणीतील तथागत गौतम बुद्धांच्या मूर्तीच्या चेहऱ्यावर दरवर्षी ९, १०, ११ मार्चला किरणोत्सव होतो. लेणीच्या दुसऱ्या मजल्यावरील पिंपळपानाच्या आकाराच्या झरोक्यातून सूर्यकिरणे लेणीत उतरतात. शुक्रवारी संध्याकाळी ४:१९ मिनिटांपासून तथागतांच्या उजव्या मांडीवर किरणे पडण्यास सुरुवात झाली. ती पुढे सरकत ५:०३ ते ५:१२ दरम्यान किरणे तथागतांच्या चेहऱ्यावर स्थिरावली. नंतर डाव्या कानाच्या बाजूने ती बाहेर निघून गेली. दरवर्षी ७, ८ व ९ ऑक्टोबरला पुन्हा एकदा किरणोत्सव होत असल्याचे औंधकर सांगतात.
विश्वकर्मा लेणीच्या समोरील दरवाजातूनच आहे अनोख्या किरणोत्सवाची खरी सोय
झरोक्यातून पडणारी किरणे उजव्या मांडीवर पडतात. मात्र, ती मांडीऐवजी पायावर पडून तथागतांचा पदस्पर्श करत असावीत, असे काही लोकांचे मत होते. श्रीनिवास औंधकर यांनी त्या दृष्टीने अभ्यास सुरू केला. २०२२ च्या किरणोत्सवात त्यांनी कंपास व अन्य साहित्यासह विश्वकर्मा लेणीचा खगोलशास्त्रीय दृष्टीने अभ्यास सुरू केला. शुक्रवारी पुन्हा ते साहित्यासह लेणीत आले. अभ्यासकांच्या मताला दुजोरा देताना लेणीच्या स्थापत्यशास्त्रानुसार किरणोत्सवासाठी झरोक्याऐवजी दरवाजातून जागा असल्याच्या निष्कर्षावर ते आले.
तांबूस रंगाची उधळण
लेणीच्या अगदी समोरच्या दिशेला सूर्यास्त होतो. या भागात झाडी असल्याने किरणे लेणीत प्रवेश करू शकत नाहीत. यामुळे हे दृश्य आजवर जगासमोर आलेे नाही. पुरातत्त्व खात्याने झाडे कापली तर दरवर्षी ५, ६ व ७ मार्चला दरवाजातून होणारा किरणोत्सव दिसेल. मावळत्या सूर्याची तांबूस किरणे तथागतांचा पदस्पर्श करून संपूर्ण मूर्ती उजळून निघाल्याचे विहंगम दृश्य अनुभवता येईल, असे औंधकर यांचा अभ्यास सांगताे.
११० वर्षांनी बदल
सूर्य २१ मार्चला विषुववृत्तात प्रवेश करतो. यामुळे या दिवशी दिवस-रात्र समान असते. कैलास लेणी, छोटा कैलास व १० नंबरची लेणी खगोलीय अभ्यास करून बांधलेली असल्याचे औंधकर सांगतात. दर ११० वर्षांनी यात एक दिवसाचा फरक पडतो. किरणाेत्सवाच्या काही वर्षांतील तारखांवरून लेणीचे अचूक वय काढणे शक्य असल्याचे ते म्हणाले. याप्रसंगी पुरातत्त्वचे समन्वयक डॉ. कामाची डक, अभ्यासक योगेश जोशी उपस्थित होते.
पुरातत्त्व खात्याने झाडे कापावीत
^वेरूळ लेणीतील किरणोत्सव पुरातत्त्व शास्त्राप्रमाणे स्थापत्य आणि खगोलीयदृष्ट्या महत्त्वाची घटना आहे. पुरातत्त्व खात्याने लेणी क्रमांक १० समोरील झाडे कापली तर मावळणाऱ्या सूर्याची किरणे दरवाजातून तथागतांच्या मूर्तीवर पडतील. लेणीचे स्थापत्य त्याच दृष्टीने करण्यात आले आहे.'
-श्रीनिवास औंधकर, संचालक, एमजीएम एपीजे अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्र, छत्रपती संभाजीनगर
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.