आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबाद-बंगळुरू इंडिगो कंपनीची विमानसेवा १५ एप्रिलपासून पुन्हा एकदा सुरू होणार आहे. विमानसेवा प्राधिकरण संचालक डी. जी. साळवे यांनी ही माहिती दिली. सकाळच्या सत्रात हे उड्डाण सुरू होणार आहे, मात्र अद्याप वेळ जाहीर केलेली नाही. याशिवाय सध्या सुरू असलेल्या दिल्ली, मुंबई आणि हैदराबादच्या सेवाही सकाळच्या सत्रात सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. टॅक्सी टर्नवेच्या कामामुळे सकाळच्या सत्रात सुरू असलेली सर्व उड्डाणे दुपारी ३ नंतरच्या सत्रात करण्यात आली होती.
आयटी हब बंगळुरूमध्ये औरंगाबादेतून जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे या विमानसेवेला चांगला प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा आहे. फेब्रुवारी २०२० मध्ये पहिल्यांदा इंडिगो कंपनीने बंगळुरूसाठी सेवा सुरू केली होती. याच वेळी स्पाइसजेट कंपनीनेही सेवा सुरू केली होती. मात्र, मार्च २०२०मध्ये कोविड निर्बंध लागू होताच दोन्ही कंपन्यांनी सेवा बंद केली. पहिला लॉकडाऊन संपल्यानंतर बंगळुरूची उड्डाणे सुरू झाली होती. मात्र, दुसरी लाट येताच ती बंद करण्यात आली होती. आता तिसऱ्यांदा विमानसेवा सुरू करण्यात आली आहे. सध्या औरंगाबादचे प्रवासी शिर्डीहून बंगळुरूला विमानाने जात होते. मात्र आता १२० किलोमीटरचा फेरा वाचणार आहे. सध्या उन्हामुळे औरंगाबादेतील पर्यटन जरी थंडावले असले तरी या भागातून दक्षिणेत पर्यटनासाठी जणाऱ्यांचीही संख्या मोठी आहे. हे उड्डाण सुरू झाल्याने प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. याशिवाय अर्थकारणालाही चालना मिळेल, अशी अपेक्षा टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या वतीने व्यक्त करण्यात आली.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.