आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापेशव्यांच्या नेतृत्वातील मराठा सैन्य आणि निजाम यांच्यात ३ फेब्रुवारी १७६० रोजी भीषण युद्ध झाले. यात मराठा सैन्याने विजय प्राप्त केला. दक्षिणेतील पाया भक्कम करून उत्तरेत पानिपतच्या लढाईला जाण्यासाठी या विजयाने मराठा सैन्याला मोठा आत्मविश्वास दिला. मध्ययुगीन भारताच्या इतिहासात उदगीरच्या लढाईला अत्यंत महत्त्व आहे. मोगल, बहामनी आणि निजाम या राजवटीतील महत्त्वाचे सत्ताकेंद्र असणाऱ्या उदगीर (जि. लातूर) येथील किल्ला आजही देदीप्यमान इतिहासाची साक्ष देत आहे.
निजामाविरुद्ध झालेल्या लढाईचे नेतृत्व सदाशिवरावभाऊ पेशवे यांनी केले. दोन दिवस चाललेल्या या युद्धाबद्दल इतिहास अभ्यासक भाऊसाहेब उमाटे म्हणाले की, चौथाई आणि सरदेशमुखीचे अधिकार नानासाहेब पेशव्यांकडे देण्याचे निजामांनी मान्य केले होते. पण त्यांच्याकडून सातत्याने टाळाटाळ केली जात होती. आता युद्धाशिवाय पर्याय नाही अशा निष्कर्षाप्रत नानासाहेब आले आणि त्यांनी युद्धाची तयारी सुरू केली. नानासाहेब पेशवे त्या वेळी नगरच्या किल्ल्यात ठाण मांडून होते. तेथूनच त्यांनी लढाईची व्यूहरचना आखली होती. राघोबादादा या किल्ल्यावर चालून आले आणि त्यांनी उदगीरच्या आसपासचा प्रदेश जिंकून घेतला. निजामाच्या सत्ताकंेद्राला सातत्याने धडका देऊन ते हादरवण्याचा प्रयत्न त्यांनी केला. ही बाब लक्षात आल्यानंतर निजामांनीही डावपेच आखणे सुरू केले. त्याच वेळी उदगीरचा किल्ला जिंकण्यासाठी सदाशिवरावभाऊ नगरवरून निघाले. निजामांनी परंड्याच्या किल्ल्याजवळ त्यांचा पराभव करण्याचा डाव आखला होता. अखेर औसा-धारूर मार्गावर तांदुळजा या गावात मराठा आणि निजामाचे सैन्य एकमेकांच्या समोर उभे ठाकले. पेशव्यांनी सरदार जानोजीराव नाईक-बावणे यांना जहागिरी दिली हाेती. येथेच दोन दिवस भीषण युद्ध झाले. आजही हा भाग शिरखंडी म्हणून ओळखला जातो.
असा आहे उदगीरचा किल्ला बालाघाट डोंगररांगांत हा किल्ला आहे. जवळ आल्याशिवाय तो दिसत नाही. या किल्ल्यात उदागीरबाबांची समाधी, जामा मशीद, दिवाण-ए-खास, स्नानगृह, काही महाल, तुरुंग, धान्याचे कोठार आदी वास्तू आहेत. याशिवाय येथे चांदणी बुरूज, जमना बुरूज, गुप्ती बुरूज, मगरध्वज बुरूज, तोफाही पाहायला मिळतात. सध्या किल्ल्याची पडझड थांबवण्यासाठी डागडुजीचे काम केले जात आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.