आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामंडप टाकून मुलांना बारावीच्या परीक्षेला बसवल्याचे प्रकरण पैठण तालुक्यातील निलजगावातील लक्ष्मीबाई माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेत उघडकीस आले होते. हे प्रकरण ताजे असतानाच दहावीच्या परीक्षेत पहिल्याच दिवशी मराठीच्या पेपरला शिक्षकच कॉपी पुरवत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. याची शहानिशा करत शिक्षण विभाग आणि मंडळाने सादर केलेल्या अहवालानंतर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शाळेची मान्यता कायमस्वरूपी रद्द करण्याचे आदेश दिले.
शनिवारपासून होणारे उर्वरित दहावीच्या पेपरचे केंद्रही बदलण्यात आले असून आता बोकूड जळगाव येथील सुरेखा शंकरसिंग नाईक विद्यालयात पेपर होतील, असे विभागीय शिक्षण मंडळाचे प्रभारी अध्यक्ष आणि शिक्षण उपसंचालक अनिल साबळे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
यंदा राज्य मंडळाने होम सेंटर दिले आहेत. याचाच गैरफायदा शाळा घेत आहेत. बारावीच्या इंग्रजीच्या पेपरला निलजगावातील लक्ष्मीबाई माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयात मुलांना मंडपाखाली परीक्षेला बसवल्याने तुमच्या शाळेची मान्यता का रद्द करण्यात येऊ नये, अशी नोटीस शिक्षण विभागाने बजावली होती. दुसरीकडे पेपरला संबंधित विषयाचे शिक्षक शाळेच्या परिसरात असता कामा नये, असा मंडळाचा नियम असूनही मराठीचे शिक्षक रोडू हावशा शिंदे हे शाळेत होते. बालभारतीचे गाइड घेऊन जातानाचे त्यांचे फोटो आणि व्हिडिओ समोर आले. यामुळे शिक्षण उपसंचालक साबळे, माध्यमिक शिक्षणाधिकारी एम. के. देशमुख, विभागीय सचिव आर. पी. पाटील यांनी केंद्रावर जाऊन चौकशी केली.
गाइड बाहेरच्या मुलांनी आणले होते, ते नष्ट करत असल्याचे उत्तर शिक्षकांनी दिले. याचा अहवाल शिक्षणमंत्र्यांना पाठवण्यात आल्यानंतर शाळेची मान्यता कायमस्वरूपी रद्द करण्यात आली. शाळेला त्यांची बाजू मांडण्यासाठी पंधरा दिवसांचा अवधी देण्यात आला आहे.
चापानेर प्रकरणातील विद्यार्थ्यावर गुन्हा दाखल : सोमवारी बारावीच्या पेपरमध्ये चापानेर येथील चंपावती कन्या विद्यालय केंद्रात एका विद्यार्थ्यांकडे मोबाइल आढळून आला होता. त्या विद्यार्थ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. गैरप्रकार आढळून आल्यास कारवाई केली जाईल, असेही साबळे म्हणाले.
‘त्या’ विद्यार्थ्यांची सोय दुसऱ्या शाळेवर करण्याचा निर्णय
ही शाळा आठवी ते बारावीपर्यंत असून २१६ विद्यार्थी आहेत. यात दहावीचे ५२ विद्यार्थी आहेत. बारावीचे केंद्र यापूर्वीच बदलण्यात आले आहे, तर दहावीचे आताचे केंद्र बोकूड जळगाव येथील सुरेखा शंकरसिंग नाईक शाळेत दिले आहे. येथे एक मुख्याध्यापक, चार उपशिक्षक आणि एक लिपिक, दोन शिपाई आहेत. परीक्षा संपल्यावर पालकांना हवे असल्यास ते मुलांची शाळा बदलू शकतात, अन्यथा त्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी विद्यार्थ्यांना दुसऱ्या शाळेत समायोजित करण्यात येईल. ही शाळा ४० टक्के अनुदानित होती. असे असतानाही शाळेने चुकीची माहिती मंडळास दिल्याचेही साबळे यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.