आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासतत आजारी पडणाऱ्या पत्नीचा आजारपणातच नैसर्गिक मृत्यू झाला. मात्र, अंत्यविधी करण्यासाठी पैसे नसल्याने सासूच्या मदतीने पत्नीचा मृतदेह राहत्या घरातच पुरला, अशी खळबळजनक कबुली काकासाहेब भुईगड याने दिली. काकासाहेब वाळूज येथे भाड्याच्या घरात राहत होता. त्याच्या खोलीत मानवी सांगाडा आढळला होता. काकासाहेब आणि त्याच्या सासूने गुरुवारी (१५ डिसेंबर) ही कबुली दिली. काकासाहेब नामदेव भुईगड (४७, रा. धानोरा, ता. फुलंब्री) हा सात महिन्यांपूर्वी हनुमाननगरात भाड्याने दोन खोल्या घेऊन राहत होता. त्याच्यासोबत त्याची पत्नी अनिता (३५), मुलगी नंदिनी (९) व सासू कडूबाई रायभान जाधव (५५) हेही राहत होते. काकासाहेब याने २५ वर्षांपूर्वीच गाव सोडल्याची माहिती त्याच्या शोधासाठी गेलेल्या पोलिस पथकाला गावकऱ्यांनी दिली. तो भविष्य सांगणे, हरवलेल्या वस्तू-व्यक्तींची माहिती देणे असे उद्योग करायचा.
विशेष म्हणजे यापूर्वी दोन पत्नी त्याला सोडून गेल्या असून अनिता ही त्याची तिसरी पत्नी होती, अशी माहिती गावकऱ्यांकडून पुढे आली.काकासाहेब किंवा त्याचे कुटुंबीय शेजाऱ्यांशी कधीच मिळून-मिसळून राहत नव्हते. त्याची पत्नी त्याच्यापेक्षा १२ वर्षांनी लहान होती. त्यामुळे बहुतांश शेजाऱ्यांना व घरमालकालाही त्याची सासू ही त्याची पत्नी, तर पत्नी मोठी मुलगी असावी, असे वाटत होते. त्यामुळेच घरात कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळल्यानंतर तो त्याच्या मुलीचाच असावा असा संशय बहुतेकांनी वर्तवला होता. या घटनेनंतर वाळूज परिसरात एकच खळबळ उडाली होती. सांगाडा कोणाचा यावर नागरिकांत चर्चा सुरू झाली होती.
पंढरपूरमधून दोघांना घेतले ताब्यात सांगाडा आढळल्याची घटना उघडकीस आल्यानंतर वाळूज पोलिसांचे पथक काकासाहेब याच्या शोधासाठी त्याच्या मूळ गावी रवाना झाले होते. वाळूज पोलिस ठाण्याचे निरीक्षक सचिन इंगोले यांच्या नेतृत्वाखालील पथकाने गुरुवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास पंढरपूर येथील एका भाड्याच्या खोलीतून काकासाहेब, त्याची मुलगी नंदिनी व सासू कडूबाई यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले.
२२ ऑगस्ट रोजी मृत्यू, अशी लावली विल्हेवाट पत्नी अनिताचा आजारपणात २२ ऑगस्ट रोजी मृत्यू झाला. अंत्यसंस्कारासाठी पैसे नसल्याने सासू कडूबाईच्या मदतीने त्याने घरातच मृतदेह पुरण्याची योजना केली. दुर्गंधी पसरू नये म्हणून १० ते १२ किलो मीठ खरेदी करत मृतदेह चादरीत गुंडाळला आणि स्वयंपाकघरात सिलिंडर ठेवण्याच्या जागेवर खड्डा खोदून त्यात मृतदेह पुरला. विशेष म्हणजे मृतदेह घरात पुरल्यानंतर हे कुटुंब महिनाभर तेथेच राहिले. त्यानंतर ते सर्व जण पंढरपुरात राहण्यास गेले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.