आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगोली:विहीरीत आढळला राज्य राखीव दलाच्या जवानाचा मृतदेह, डोक्यात जखमा असल्याने खूनाचा संशय

हिंगोलीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली तालुक्यातील लोहगाव शिवारातील एका विहिरीत हिंगोलीच्या राज्य राखीव दलाच्या जवानाचा मृतदेह बुधवारी ता. १७ दुपारी आढळून आला आहे. राजकुमार उत्तम पवार (३५) असे या जवानाचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांच्या डोक्यात जखमा असल्याने त्यांचा खून झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सेनगाव तालुक्यातील होलगिरा येथील राजकुमार उत्तम पवार (३५) हे हिंगोलीच्या राज्य राखीव दलात सन २००६ मध्ये भरती झाले होते. सध्या ते ई कंपनीमध्ये कार्यरत होते. मंगळवारी ता. १६ रात्री ते जांभरून तांडा येथून हिंगोलीकडे येत होते. मात्र ते घरी पोहोचले नाही. त्यामुळे त्यांच्या कुटूंबियांनी त्यांचा शोध सुरू केला होता.

दरम्यान, आज दुपारी लोहगाव शिवारात एका विहिरी मध्ये त्यांचा मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच पोलिस अधिक्षक राकेश कलासागर यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलिस अधिक्षक यशवंत काळे, सहाय्यक पोलिस अधिक्षक यतीश देशमुख, गुुन्हे शाखेचे निरीक्षक उदय खंडेराय, सहाय्यक पोलिस निरीक्षक बळीराम बंदखडके, उपनिरीक्षक शिवसांब घेवारे, किशोर पोटे, जमादार चव्हाण, रवीकांत हरकाळ यांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली.

पोलिसांनी जवान राजकुमार पवार यांचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढला. त्यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केला. उत्तरीय तपासणी मध्ये त्यांच्या डोक्यात जखमा दिसून येत असल्याने त्यांचा खून झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. त्यानुसार पोलिसांनी काही जणांची चौकशी सुरू केली आहे. याप्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात रात्री उशिरा पर्यंत कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल झाला नव्हता.

यासंदर्भात राज्य राखीव दल कार्यालयाशी संपर्क साधला असता जवान राजकुमार पवार हे ता. ३ मार्च पासून पंधरा दिवसाच्या अर्जित रजेवर असल्याचे सांगण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुली असा परिवार असल्याचेही राखीव दलाच्या सूत्रांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...