आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगोली:नंदगाव शिवारात पुरात वाहून गेलेल्या तरुण शेतकऱ्याचा मृतदेह सापडला

हिंगोली19 दिवसांपूर्वीलेखक: मंगेश शेवाळकर
  • कॉपी लिंक

औंढा नागनाथ तालुक्यातील नंदगाव शिवारामध्ये नंदगाव भोसी नदीच्या पुरामध्ये वाहून गेलेल्या तरुण शेतकऱ्याचा मृतदेह रविवारी ता. 5 सकाळी सहा वाजता सापडला. संजय सिताराम धनवे (37) असे या शेतकऱ्याचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार औंढा तालुक्यातील नांदगाव येथील शेतकरी संजय धनवे यांचे नंदगाव भोसी नदीच्या पलीकडे पाच एकर शेत आहे. शनिवारी सकाळी धनवे हे कुटुंबियासह शेतात गेले होते.

सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास सर्व जण घरी परतले. त्यानंतर सहा वाजता धनवे हे दूध आणण्यासाठी शेताकडे निघाले होते. शेतात जाण्यासाठी नंदगाव येथील भोसी नदीचे सुमारे 50 ते 60 फुटाचे पात्र ओलांडून जावे लागते. या नदीच्या पत्रामध्ये पाणी कमी असल्याचे गृहीत धरून धनवे पाण्यातून जाऊ लागले. मात्र अचानक नदीच्या पात्रातील पाणी वाढले त्यामुळे पुर आला पाण्याचा वेगही वाढला. नदीच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या त्यांच्या भावाने ओरडून येऊ नको असा इशारा केला.

मात्र तोपर्यंत धनवे हे नदीच्या मध्यापर्यंत पोहोचले होते. पुराचे वाढलेले पाणी आणि पाण्याचा वेग यामुळे काही कळण्याच्या आतच धनवे पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले.या घटनेची माहिती मिळाल्यानंतर औंढा नागनाथ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे जमादार दिघाडे, गोरे यांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली. तसेच गावकऱ्यांनीही घटनास्थळी धाव घेतली. पोलीस व गावकऱ्यांनी धनवे यांचा शोध सुरू केला.

दरम्यान आज सकाळी घटनास्थळापासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर संजय धनवे यांचा मृतदेह आढळून आला. पोलीस व गावकऱ्यांनी त्यांचा मृतदेह पाण्याबाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी औंढा नागनाथ येथील ग्रामीण रुग्णालयात आणला आहे. याप्रकरणी औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती. मयत शेतकरी धनवे यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, एक मुलगा एक मुलगी असा परिवार आहे त्यांच्या निधनाने गावावर शोककळा पसरली आहे.

बातम्या आणखी आहेत...