आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगोली:चिंचोर्डी शिवारामध्ये पुरात वाहून गेलेल्या सहा वर्षीय चिमुरडीचा मृतदेह दीड किलोमीटर अंतरावर सापडला

हिंगोली19 दिवसांपूर्वीलेखक: मंगेश शेवाळकर
  • कॉपी लिंक

कळमनुरी तालुक्यातील चिंचोर्डी शिवारामध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या संध्या तागडे (6) या चिमुरडीचा मृतदेह सतरा तासानंतर रविवारी ता. 5 सकाळी साडेनऊ वाजता घटनास्थळावरून दीड किलोमीटर अंतरावर झुडपात सापडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हादगाव तालुक्यातील करोडी येथील संध्या तागडे ही चिमुकली तिच्या आजी-आजोबांकडे चिंचोर्डी येथे आली होती. शनिवारी ता. 4 ती शेतात गेली होती. दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास जोरदार पावसामुळे संध्या तिच्या आजी आजोबा सह गावात परतत होती. यावेळी चिंचोर्डी शिवारातील पुलावरून वाहणाऱ्या पाण्यात ती वाहून गेली.

सदरील घटनेची माहिती मिळाल्यानंतर कळमनुरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुनील निकाळजे, जमादार शामराव गुहाडे, प्रशांत शिंदे, शशिकांत भिसे तसेच गावकरी भारत कुरुडे यांनी घटना स्थळी धाव घेऊन तिचा शोध सुरू केला होता. तसेच कळमनुरीचे तहसीलदार श्रीराम पाचपुते यांचे पथकही घटनास्थळी दाखल झाले होते. तसेच कळमनुरी येथील समशेर पठाण यांना पुराच्या पाण्यात मुलीचा शोध घेण्यासाठी बोलवण्यात आले होते. मात्र रात्री उशीर झाल्यामुळे तिचा शोध लावण्यात अडथळे निर्माण झाले.

दरम्यान आज सकाळी सहा वाजल्यापासून पोलिस व गावकऱ्यांनी शोध सुरू केला. सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घटनास्थळापासून सुमारे दीड किलोमीटर अंतरावर तिचा मृतदेह झूडूपात अडकलेल्या स्थितीत आढळून आला आहे. तब्बल सतरा तासानंतर संध्याचा मृतदेह आढळून आला. सहा वर्षीय मुलीचा मृतदेह पाहून तिच्या कुटुंबियांनी हंबरडा फोडला. त्यामुळे घटनास्थळावरील वातावरण गंभीर झाले होते. याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करण्याची कारवाई सुरू केली आहे.

बातम्या आणखी आहेत...