आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकिरकोळ वाद झाल्यानंतर एक सतरा वर्षीय मुलगी रागाच्या भरात घरातून निघून गेली. काही तासांनी ती विहिरीत पडलेली दिसली. वडिलांनी भाऊ व इतर दोघांच्या मदतीने तिला बाहेर काढले. वडिलांनी घरातील इतर सदस्यांना एका खोलीत बंद करून मुलीचा मृतदेह विहिरीजवळ पुरून टाकला. चार दिवसांनंतर पोलिसांना ही माहिती कळली. दरम्यान, गुरुवारी मुलीचा मृतदेह पुन्हा काढून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात येणार आहे.
राधा जारवाल असे मुलीचे नाव असून हा प्रकार ऑनर किलिंगचा असल्याची चर्चा होती. २२ सप्टेंबर रोजी दुपारी पोलिस निरीक्षक राजश्री आडे यांना एका व्यक्तीने फोन करून गावातील सतरा वर्षीय मुलीचा संशयास्पद मृत्यू झाल्याची माहिती दिली. पोलिस जारवाल कुटुंबीयांच्या घरी पोहचले. परंतु कोणीही काही बोलायला तयार नव्हते.
विचारपूस सुरू केल्यानंतर जारवाल यांनी त्यांना तीन मुली व दोन मुले असल्याचे सांगितले. मात्र, मोठी मुलगी राधा कुठे आहे, असे विचारताच कुटुंबातील सर्वच जण शांत झाले. पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर वडिलांनी तिचा मृत्यू झाल्याची कबुली दिली. मात्र, त्याव्यतिरिक्त काहीच माहिती दिली नाही. अखेर पोलिसांनी कुटुंबातील इतर सदस्यांची चौकशी सुरू केल्यावर वेगवेगळी धक्कादायक माहिती समोर येत गेली.
सर्वच प्रश्न अनुत्तरित
या संपूर्ण घटनेत मुलगी बेपत्ता झाली हे निश्चित झाले. मात्र, तिचे काय झाले, याबाबत काहीच निश्चित होऊ शकले नाही. प्राथमिक चाैकशीत ती ज्या विहिरीत सापडली त्याच विहिरीच्या शेजारी कुठलीही खातरजमा न करता थेट मृतदेह पुरल्याचा दाट संशय पोलिसांना आहे. मुलीने आत्महत्या केली तर तिला विहिरीतून काढल्यानंतर इतर नातेवाईक निघून का गेले? मुलीला काही वेळ घरासमोर बाजेवर ठेवले. वडिलांनी घरातील सदस्यांना आतच थांबवून तिला एकट्याने नेऊन शेतात परस्पर का पुरले, हे प्रश्न अनुत्तरित आहेत.
पोलिसांच्या तपासात राधाच्या दोन लहान बहिणी व भावांनी पोलिसांना घटनाक्रम सांगितला. राधा संध्याकाळी स्वयंपाक करत असताना वडिलांनी तिला मारले. ती घराबाहेर पडली. ती दिसत नसल्याने कैलास यांनी शोध सुरू केल्यावर शेतातील विहिरीत तिचा मृतदेह आढळला. त्यांनी तो वर काढला. ती मृत्यूमुखी पडल्याचे त्यांनी परस्पर ठरवले व नातेवाईक निघून गेले. राधाला खाटेवर ठेवत मुलांना, पत्नीला घरातच थांबवले. त्यानंतर कैलासने मुलीला विहिरीजवळ पुरले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.