आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नसोहळ्यापूर्वी आजोबांना मारहाण:नवरीने लग्नच मोडले, वऱ्हाडी आल्यापावली परत फिरले

औरंगाबाद15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईहून आलेल्या वऱ्हाडातील नवरदेवाच्या मित्रांनी यथेच्छ दारू प्यायली. त्यानंतर मानपानावरून वाद हाेऊन तुफान हाणामारी झाली. नवरदेवासोबत आलेल्या सर्वच वाहनांची तोडफोड झाली. शिवाय आजाेबांना मारहाण झाल्याने संतापलेल्या नवरीने लग्नच मोडले. ही घटना बुधवारी दुपारी गांधेली शिवारात घडली.

मुंबईतील बच्छिरे कुटुंबातील मुलाचे गांधेलीतील तरुणीसोबत लग्न जमले होते. मुलीचे कुटुंब मूळ जालना जिल्ह्यातील असले तरी ते मुंबईत राहतात. मात्र, तिची बहीण गांधेली परिसरात असल्याने त्यांनी बुधवारी साडेबारा वाजता लग्नाचा मुहूर्त ठरवला. बच्छिरे कुटुंब वऱ्हाडासह गांधेलीत येताच वाजतगाजत लग्नाची तयारी सुरू झाली.

वरात निघणार तोच वऱ्हाडातील नवरदेवाचे तरुण मित्र यथेच्छ दारू प्यायले. मानपानावरून नवरदेवाकडील लोकांनी आक्षेप घेतला. बाचाबाची हाेऊन काही मिनिटांत हाणामारी सुरू झाली. मुंबईच्या वऱ्हाडात तरुणांची संख्या अधिक असल्याने त्यांनी धिंगाणा सुरू केला. त्यामुळे स्थानिकांचा पारा चढला आणि त्यांनी सगळ्यांना चोप दिला. त्यात दगडफेक झाल्याने वऱ्हाड घेऊन आलेली ट्रॅव्हल्स आणि इतर सर्व वाहनांची तोडफोड झाली. गावातील काही स्थानिकांनी मध्यस्थी करून वाद मिटवला.

वऱ्हाडी आल्यापावली परत फिरले

घटनेची माहिती चिकलठाणा पोलिसांना देण्यात आली. मात्र, भांडणात नवरीच्या कुटुंबीयांना मारहाण झाली हाेती. नवरदेवाच्या कुटुंबाचे आणि मित्रांचे वागणे, आजोबांना झालेली मारहाण यामुळे नवरीला राग अनावर झाला. तिने तत्काळ लग्न मोडल्याचे जाहीर केले. मुंबईहून आलेले वऱ्हाडी तोडफोड झालेल्या वाहनांसह आल्यापावली माघारी फिरले. रात्री उशिरापर्यंत चिकलठाणा पोलिस ठाण्यात याप्रकरणी कुठलीही तक्रार दाखल झाली नव्हती.

बातम्या आणखी आहेत...